सार्वजनिक ठिकाणी राजकीय फलक लावण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे. तरी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी स्वागत फलक लावून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. याबाबत आता संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असतानाच्या काळात हिवाळी अधिवेशनादरम्यान मंत्री आणि नेत्यांच्या स्वागत फलकांमुळे शहराचे विद्रूपीकरण होत होते. या विरुद्ध तेव्हा भाजपनेच आंदोलन केले होते. सत्ता आल्यावर मात्र भाजप कार्यकर्त्यांना याचा विसर पडल्याचे चित्र आज शहराच्या ठिकठिकाणी दिसून आले. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने भाजप नेत्यांनी वर्धा मार्गावर ठिकठिकाणी स्वागत फलक लावले होते. काही ठिकाणी वाहतूक सिग्नलच्या खांबालाच फलक बांधण्यात आले होते. यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा नियमभंग होत असल्याचे दिसून आले.

सत्तेत असताना अवैध फलकांच्या विरुद्ध आंदोलन करणारे आज सत्तेत आल्यावर गल्लीबोळीत फलक लावत सुटले आहेत. न्यायालयाचे आदेश पायदळी तुडवले जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वाढदिवशी फलक लावू नका, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. यात्रेसाठी लावलेल्या फलकांकडे मात्र त्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले. यातून त्यांचा दुटप्पीपणा दिसून येतो.

– अतुल लोंढे, प्रवक्ते, काँग्रेस</p>