व्हीएनआयटी केवळ देश-परदेशातच नव्हे तर नागपुरातही तंत्रज्ञानाचा उपयोग करून देत आहे. नागपुरातील बहुप्रतीक्षित मेट्रो आणि नदी जोड प्रकल्पांसाठी व्हीएनआयटी मोलाची तांत्रिक मदत करीत आहे.

नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड हा भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्यात तांत्रिक मदत करीत असल्याचा आनंद व्हीएनआयटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष विश्राम जामदार यांनी व्यक्त केला. मेट्रोमध्ये उड्डाण पुलांबरोबरच पाच किलोमीटरचा भुयारी मार्ग आहे. कोणतेही बांधकाम म्हटले तर त्यासाठी केवळ आजचा विचार करून चालत नाही तर भविष्यात लोकसंख्या वाढीच्या तुलनेत बांधकामातील टिकाऊपणा तपासावा लागतो. त्या तोडीचे तंत्रज्ञान उपयोगात आणावे लागते. भुयारी मार्गाबरोबरच इतरही बांधकामांसाठी व्हीएनआयटीतील संशोधक विद्यार्थी मेट्रोला तांत्रिक मदत करीत आहेत. खास करून स्ट्रक्चरल आणि मायनिंग इंजिनिअरिंगमध्ये सल्ला देण्याबरोबरच तांत्रिक बाजूही समजावून सांगितल्या जात आहेत. मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी मायनिंग आणि स्ट्रक्चरल तंत्रज्ञानासाठी दिल्ली आणि मुंबई आयआयटीची मदत घेण्याचे ठरवले होते. आम्ही त्यांना व्हीएनआयटीचा विचार याकामी करावा आणि समाधान न झाल्यास नंतरच दिल्ली किंवा मुंबईतील आयआयटीशी संपर्क साधावा, असे आवाहन केले होते. त्यानुसार त्यांनी व्हीएनआयटीत उच्च प्रकारच्या तंत्रज्ञानाची चाचपणी केली आणि त्यांचे समाधान झाल्याने आज व्हीएनआयटीतील तज्ज्ञ, अनेक विद्यार्थी मेट्रोच्या कामात मदत करीत असून याकाम दीक्षित आणि व्हीएनआयटीचा विद्यार्थ्यांमध्ये आधी संवाद घडवून आणल्याचे ते म्हणाले.

शिवाय नदी जोड प्रकल्पांतर्गत संशोधनासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी व्हीएनआयटीचे व्यासपीठ आम्ही खुले केले होते. त्यानुसार केवळ भारतच नव्हे तर भुतान, चीन आणि श्रीलंका या देशातून वाहणारी आणि दरवर्षी पूर येऊन लाखो लोकांना बेघर करणाऱ्या ब्रम्हपुत्रेवर संशोधनासाठी नागपुरातूनच पुढाकार घेण्यात आला आहे. सिंचन विभागातील अभियंता जनबंधू यांनी संपर्क साधून व्हीएनआयटीमध्ये संशोधनाचे काम सुरू केले असून भविष्यात व्हीएनआयटीचे याही क्षेत्रात योगदान राहील, असे जामदार म्हणाले.