नागरिकांच्या बेशिस्तीमुळे स्वच्छता मोहीम फसण्याच्या मार्गावर; काढलेला गाळ पुन्हा नदीमध्येच

महापालिकेने पुरातन आणि ऐतिहासिक अशा नाग नदी, पिवळी नदी आणि पोरा नदीचे पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरणाचा संकल्प करून विविध सामाजिक, शासकीय आणि लोकसहभागातून नद्या-नाले स्वच्छतेचे काम सुरू केल्यानंतर आठ दिवसांत स्वच्छ केलेल्या जागेवर पुन्हा कचरा जमा झाला आहे. नद्यांमधून काढण्यात आलेला गाळ पुन्हा काही लोक नद्यांमध्ये टाकत असून महापालिका प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

शहराच्या विकासाच्या दृष्टीने आणि पावसाळ्यात नागरिकांना कुठल्याही संकटाला सामोरे जाऊ लागू नये या उद्देशाने पावसाळ्यापूर्वी महापालिकेने शहरातील नागनदी, पिवळी नदी आणि पोरा नाल्याची साफसफाई मोहीम हाती घेतली आणि त्यासाठी मोठी यंत्रणा कामाला लावली आहे. मात्र, गेल्या सोमवारी नद्या स्वच्छता मोहीम सुरू केल्यानंतर काढण्यात आलेला गाळ प्रत्यक्षात तीन दिवस झाले असताना उचलण्यात आलेला नाही.

पिवळ्या नदीची साफसफाईसाठी महापालिकेचे दोनशेपेक्षा जास्त सफाई कर्मचारी राबत आहेत. मानकापूर ते रिंग रोड, ऑटोमोटिव्ह चौक ते कळमना पूल आणि रिंग रोड ते भरतवाडा अशा तीन भागात पिवळ्या नदीची साफसफाई करण्यात येत असताना त्या भागातील काही ठिकाणी पुन्हा कचरा दिसून येत आहे. गेल्या आठ दिवसांत नागनदीचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न केला जात असताना काही नागरिक मात्र पुन्हा कचरा टाकत आहे. पिवळ्या नदीला अनेक लोकांकडील मलवाहिनी जोडल्या असून त्या बंद करण्यासंदर्भात काही नागरिकांना नोटीस देण्यात आल्या असल्या तरी त्या बंद न करण्यात आल्यामुळे त्यातून सांडपाण्याचा निचरा मोठय़ा प्रमाणात होऊ लागला आहे. भरतवाडा, रिंगरोड या भागातील नाल्याच्या काठी असलेल्या लोकांनी पुन्हा कचरा टाकणे सुरू केले आहे. नाल्याच्या काठावर असलेली अतिक्रमणे काढण्यात आल्यानंतर पुन्हा त्या जागेवर काही छोटय़ा विक्रेत्यांनी बस्तान मांडले आहे.

पिवळी नदी परिसरात असलेल्या बाजारातील कचरा नदीत टाकला जात आहे. अतिवृष्टीने गेल्या वर्षी शहराचे झालेले हाल बघता नागरिकांनी नद्या आणि नाले स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. जे लोक नाल्यात कचरा टाकतील अशा नागरिकांवर महापालिकेने कारवाई करणे आवश्यक आहे त्यासाठी नाल्याच्या काठी सुरक्षा रक्षकांची किंवा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक असल्याचे मत काही नागरिकांनी व्यक्त केले.

६४ हजार मेट्रिक टण गाळ काढला

महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागात सुरू करण्यात आलेल्या नदी स्वच्छता अभियानात आतापर्यंत ६४ हजार मेट्रिक टण गाळ काढण्यात आला. नागनदी, पिवळी नदीपेक्षा सर्वाधिक गाळ हा पोहरा नदीतून काढण्यात आला आहे. महापालिकेने यापूर्वी लोकसहभागातून नागनदी, पिवळी नदी स्वच्छता मोहीम राबविली असताना यावर्षी तसेच अभियान राबविण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी नद्या स्वच्छता अभियान राबविण्यासाठी महापालिकेने तीनही नद्यांची १३ भागात विभागणी करण्यात आली आहे.९ मेपासून नदीसफाई अभियानाला प्रारंभ करण्यात आला. ५ जून पर्यंत हे अभियान चालणार आहे. एकूण १२ पोकलेन, ८ जेसीबी, १८ टिप्परच्या सहाय्याने नद्याची सफाई केली जात आहे तर ७० कर्मचारी सफाई कामात लागले आहे.

नदी स्वच्छता मोहीम राबविण्याचा महापालिकेतर्फे प्रयत्न होत असला तरी नागरिकांनी त्यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे. नाल्याकाठी असलेला गाळ तात्काळ उचलण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे तो परत नाल्यामध्ये जाणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. शहरातील तीनही नाल्यांची साफसफाई मोहीम जोमात सुरू असून सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. त्यासाठी सर्व शासकीय आणि सामाजिक आणि प्रसार माध्यमांचे सहकार्य मिळत आहे.

–  प्रवीण दटके, महापौर