X

जलाशय संवर्धनाचा प्रयोग यशस्वी!

जलाशयांमध्ये गेल्या काही वर्षांत ‘बेशरम’(इकोर्निया) सारख्या बाहेरच्या वनस्पतींचा प्रादुर्भाव होत आहे.

गोंदिया जिल्ह्य़ातील स्वयंसेवकांच्या धडपडीमुळे दोन उत्कृष्ट जलोद्यानांची निर्मिती

जलाशयांच्या पर्यावरणावर इतर जैवविविधतेतील इतर घटक निर्भर असतात, पण जलाशयांचे पर्यावरणच खराब असेल तर हे घटक पाठ फिरवतात. तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्य़ात सध्या अशीच परिस्थिती उद्भवली आहे. सारस आणि स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर असलेल्या या जिल्ह्य़ातील जलाशयांचे पर्यावरण टिकवण्यासाठी स्वयंसेवींनी धडपड केली. त्यातून परसवाडा व लोहारा अशी दोन उत्कृष्ट जलोद्याने तयार झाली. हा राज्यातला पहिला प्रयोग ठरला आहे.

गोंदिया, भंडारा हे तलावांचे जिल्हे आहेत. एकटय़ा गोंदिया जिल्ह्य़ात काही दशकांपूर्वी ३० हजाराच्या आसपास जलाशये होती, पण आता काहीच जलाशये शिल्लक राहिली आहेत. ज्या जलाशयाची जैवविविधता चांगली त्यावर पक्षी येतात. गोंदिया जिल्हा कधीकाळी स्थलांतरित पक्षी आणि सारसांसाठी प्रसिद्ध होता, पण जलाशयांची गुणवत्ता घसरली आणि या पक्ष्यांची संख्याही कमी झाली. सारस संवर्धनासाठी काम करणाऱ्या ‘सेवा’च्या चमूने या पक्ष्याचा अधिवास असणारी जलाशये निवडली. परसवाडा आणि लोहारा या दोन तलावांकरिता त्यांना प्रामुख्याने सामाजिक वनीकरण, जैवविविधता विभाग, वनविभागानेही सहकार्य केले. जलाशयांची स्थिती, त्याची जैवविविधता, त्यावर येणारे पक्षी आणि पर्यावरण या सर्वाचा अभ्यास सुरू केला. जलाशये टिकवण्याच्या मूळ कारणांचा शोध घेतला. या दोन गावानंतर जिल्ह्य़ातील इतरही तलावांसाठी त्यांनी समाजाधारित संवर्धनावर अभ्यासपूर्ण व्यवस्थापन आणि कृती आराखडा तयार केला आहे. यात अशाच गावातील जलाशये निवडण्यात आली, ज्यांना तिथल्या वनस्पतीचे, पक्ष्यांचे ज्ञान आहे. तलाव वाचले तर पक्षी वाचतील याचे ज्ञान आहे. जिल्हा प्रशासनाकडे त्यासंबंधीचा प्रस्तावही त्यांनी पाठवला होता. त्यानंतर पाठवलेला पुनर्प्रस्ताव मागील मार्च-एप्रिलपासून जिल्हा प्रशासनाकडेच पडून आहे, पण अजूनपर्यंत त्यावर विचार झालेला नाही. मात्र, सारसांच्या भवितव्याच्या आणि एकूणच गोंदिया जिल्ह्य़ातील स्थानिक व स्थलांतरित पक्षीवैभव जागतिक पातळीवर नेऊन ठेवण्यासाठी प्रशासन त्यादृष्टीने लवकरच सकारात्मक पावले उचलेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. विशेष म्हणजे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली आणि सलीम अली यांचे वास्तव्य राहिलेल्या आणि सारसांसाठी कधीकाळी प्रसिद्ध नवेगावबांधच्या नवेगाव तलावाचा पण समावेश आहे. विशेषकरून मारुती चितमपल्ली यांनी अवघे आयुष्य या जैवविविधतेच्या संरक्षणासाठी घालवले. आता त्यांचाच वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न चेतन जासानी, मुनेश गौतम, अविजित परिहार, अंकित ठाकूर, शशांक लाडेकर, कन्हैय्या उदापुरे, दुष्यंत आकरे ही ‘सेवा’ची तरुणाई करत आहेत.

जलाशयांची जैवविविधता नष्ट होण्यामागील कारणे

जलाशयांमध्ये गेल्या काही वर्षांत ‘बेशरम’(इकोर्निया) सारख्या बाहेरच्या वनस्पतींचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे जलाशयांची जैवविविधता नष्ट होत आहे. मासेमारी संघटनांना तलाशयावर मासेमारी लीजवर दिली जाते. या जलाशयांमध्ये कोणत्या प्रजातीच्या मास्यांचे आणि किती प्रमाणात, कशा प्रकारे बीज टाकले जावे यासंबंधीचे नियम आहेत. मात्र, प्रशासनाचे त्यावर नियंत्रण नाही. त्याचा फायदा घेत मासेमारी संघटना अधिक उत्पादन आणि व्यापाराच्या दृष्टिकोनातून झटपट वाढणाऱ्या आणि मोठय़ा प्रमाणावर बीज टाकतात. त्याचा दुष्परिणाम जलाशयाच्या जैवविविधतेवर होत आहे. जलाशयाच्या आजूबाजूला असणाऱ्या शेतांमध्ये रासायनिक खते आणि रासायनिक औषधांची फवारणी केली जाते. या शेतांमधील पाणी जलाशयात येत असल्याने जलाशयातील पाण्याची गुणवत्ता खराब होते. एमआरजीएस आणि इतर योजनांच्या माध्यमातून येणाऱ्या निधीतून जलाशयांचे खोलीकरण केले जाते. मात्र, जलावातील जैवविविधतेचा विचार न करता सरसकट खोलीकरण केले जाते. स्थानिक वनस्पती यामुळे नष्ट होतात आणि त्याच्या पुनरुज्जीवनाचा विचार प्रशासन करत नाही.

जलाशय नष्ट होण्यामागील कारणे

शासकीय, माजी मालगुजारी, मध्यम प्रकल्प, खासगी असे जलाशयांचे अनेक प्रकार आहेत. एकटय़ा गोंदिया जिल्ह्य़ात हजारोंच्या संख्येत खासगी जलाशये होती, पण अलीकडच्या अहवालानुसार त्यातील ९० टक्के जलाशये संपली आहेत. या जलाशयाचे सिंचन मालकांपुरतेच, त्यातील मासेमारी मालकांपुरतीच होती. मात्र, कुटुंब विस्तारत गेले आणि जलाशयांच्या जागी शेतीने घेतली. माजी मालगुजारी जलाशये परिसरातील शेतीच्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले. खासगी तलाव संपण्याच्या मार्गावर असली तरीही इतर तलाव कशी वाचवता येईल यादृष्टीने प्रशासन पातळीवर गांभीर्याने प्रयत्न होणे गरजेचे आहे.

जलाशये वाचवण्यासाठी अनेक वर्षांपासून या परिसरात राहणारे लोक आणि वर्षांनुवर्षांपासून काम करणाऱ्यांचे ज्ञान आणि वैज्ञानिक गोष्टी यांची सांगड घालून तलावांचे ‘रिस्टोरेशन’ आणि व्यवस्थापन आराखडा, त्यानंतर कृती आराखडा आणि अंमलबजावणी असे तीन टप्पे आहेत. आम्हीही तेच केले. परसवाडा आणि लोहारा या जलाशयावर येणाऱ्या पक्षी, वनस्पती आणि मास्यांच्या प्रजातीची यादी तयार केली. बाहेरचे मासे आणि स्थानिक मासे यांची यादी तयार केली. काय करावे आणि काय करु नये याचीही यादी तयार केली. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांच्याच सहकार्याने काम सुरू केले. आज या दोन्ही गावांमधील जवळजवळ सर्वच भिंतींवर चित्रकलेच्या माध्यमातून जनजागृतीचा प्रयत्न केला आहे. त्याचे फलित म्हणजे आज हे दोन्ही जलाशय संवर्धनासाठी ‘मॉडेल’ म्हणून तयार आहेत.

सावन बाहेकर, वन्यजीवतज्ज्ञ व अध्यक्ष, सेवा संस्था

 

  • Tags: water-conservation,
  • वाचा / प्रतिक्रिया द्या
    Outbrain