लोकसत्‍ता टीम

अमरावती : अचलपूर येथील सिटी हायस्कूल मधील एका मतदान केंद्रावर यंत्रात बिघाड झाल्याने मतदारांना पाऊण तास ताटकळत उभे राहावे लागले. अमरावती शहरातील रुक्मिणीनगर भागातील महापालिकेच्‍या शाळा क्रमांक १९ मध्‍ये देखील मतदान यंत्रातील बिघाडामुळे अर्ध्‍या तासाचा वेळ वाया गेला.

अचलपूर येथील या मतदान केंद्रावर सकाळी सात वाजता मतदान यंत्रणा सुरू झाली होती. दुपारी सव्वा अकराच्या सुमारास ३६१ मतदान झाल्यानंतर मतदान यंत्रात बिघाड झाला. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून यंत्रात बिघाड आल्याची माहिती देण्‍यात आली. दुपारी पाउणे बारा वाजताच्या सुमारास मतदार यंत्र बदलविण्यात आले त्यानंतर सुरळीत मतदान सुरू झाले. मतदान करण्यासाठी जवळपास ७० ते ८० मतदार रांगेत उभे होते.

आणखी वाचा-आमदार बच्‍चू कडूंचे आधी रक्‍तदान, मग मतदान

बेगमपुरा येथील नगर परिषदेच्‍या शाळेतही मतदान यंत्रात बिघाड झाला होता. गेल्या काही वर्षांपासून आम्ही मतदान करत आहोत. तसेच आम्हाला जी मतदार यादी मिळाली त्यामध्ये नाव आहे म्हणून त्यात दिलेल्या मतदान गेल्यानंतर केंद्रावर तुमचे या मतदार यादीत नाव नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही मतदान कोणाला करणार, असा प्रश्न विचारला असता प्रशासनानेही उडवाउडवीची उत्तरे दिली, अशी तक्रार मतदारांमधून येत होती.

काहींच्या म्हणण्यानुसार ऑनलाईन यादीत मतदाराचे नाव आहे. मात्र, प्रत्यक्षात मतदानकेंद्रावर नाही. त्यानंतर शोधा-शोध केली असता भलत्याच मतदानकेंद्रावर नाव आले होते. विदर्भ महाविद्यालयातील मतदान केंद्रावर खोली शोधण्‍यासाठी एक तासाहून अधिक वेळ लागला, अशी तक्रार मतदारांनी केली. अमरावती लोकसभा मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.४० टक्‍के मतदान झाले असून सर्वांधिक ३६.३५ टक्‍के मतदान अचलपूर विधानसभा मतदार संघात झाले आहे.