नियोजनपूर्वक प्रयत्नांद्वारे पाणीटंचाईचा मुकाबला शक्य

उन्हाचा वाढलेला तडाखा, शहरात काही वस्त्यांमध्ये निर्माण झालेली पाणी टंचाई या पाश्र्वभूमीवर महापालिकेसह अनेक सामाजिक संस्थांनी पाणी जपून वापरण्याचे केलेल्या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत शहरात चोवीस तास पाणी असलेल्या काही वस्त्यांमध्ये वेगवेगळ्या कामांसाठी पाण्याची नासाडी केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

राज्यातील विविध भागात दुष्काळी परिस्थितीत नागपूर महापालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सने जुलै महिन्यापर्यंत पाणी पुरेल इतका पाणी साठा उपलब्ध असल्याचा दावा केला असला तरी जसजसा उन्हाचा तडाखा वाढत गेला तसतसा शहरातील काही वस्त्यांमध्ये जलसंकट निर्माण झाले आहे. शहरातील १२ प्रभागांमध्ये सध्या पाण्याचा तुटवडा असून त्यात उत्तर, पूर्व आणि दक्षिण नागपुरातील अनेक वस्त्याचा समावेश आहे. मुख्यमंत्र्याचा मतदार संघ असलेल्या दक्षिण-पश्चिम मतदार संघातील अनेक वस्त्यांमध्ये पाण्याची टंचाई आहे. या संदर्भात विरोधी पक्ष नेते विकास ठाकरे यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता.

याशिवाय पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण नागपुरातील अनधिकृत वस्त्यांमध्ये पाण्याचा तुडवडा असून, लोकांना त्यासाठी वणवण हिंडावे लागते आहे. तर दुसरीकडे शहरातील काही भागात पाण्याचा साठा असल्यामुळे त्याची नासाडी केली जात आहे. पिण्याचे पाण्याचा उपयोग कुलर आणि गाडय़ा धुण्यासाठी केला जात असल्याचे चित्र शहरातील काही भागात दिसून येत आहे. कुलरमध्ये, पाणपोई केंद्रावर आणि अंगणात सडा टाकण्यासाठी पाण्याचा यथेच्छ वापर केला जात असून, दररोज हजारो लीटर पाणी अक्षरश: वाया घालविले जात आहे. शहरातील मोठय़ा वाहन दुरुस्ती केंद्रावर गाडय़ा धुण्यासाठी पाणी वाया घालविले जात असल्याचे चित्र तर सर्रास पाहायला मिळते.

शहराच्या अनेक भागातील नळाच्या तोटय़ा गळतात तर काही ठिकाणी ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सचे काम सुरू असल्यामुळे त्याठिकाणी फुटलेल्या पाईप लाईनमधून पाण्याची मोठय़ा प्रमाणात नासाडी होते. काही घरांमध्ये रोज पाण्याचा साठा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते शीळे झाले म्हणून फेकून देण्याचा प्रकार पहावयास मिळतो.

उत्तर नागपुरातील नारी भागात बहुसंख्य घरातील नळाला पाणी येत नसल्याच्या तक्रारी आहेत. विहिरी आटल्या, बोअरवेलही नादुरुस्त अवस्थेत आहेत. अशावेळी पाणी मिळविण्यासाठी पहाटेपासून भटकंती सुरू होते. घरी नळ असूनही मुख्य पाईपलाईन फोडून अनधिकृतपणे पाणी घेतले जात आहे.  तक्षशिलानगर, मयूरनगर, कडू ले-आऊट, बाबादीपनगर, दीपकनगर, मैत्री कॉलनी, समतानगर या भागात जलवाहिन्या नाहीत. येथील नागरिक विहिरींच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र विहिरीचेही पाणी आता खोल गेले आहे. पश्चिम नागपुरातील जयताळा, गावंडे ले आऊट आदी वस्त्यांमध्ये दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत असून टँकरही वेळेवर येत नसल्याने नागरिकांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे.  उत्तर नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये नळाला पाणीच येत नसल्याने नागरिक टँकरची मागणी करतात. मात्र टँकर पोहचेलच याची शाश्वती नसते त्यामुळे खासगी टँकरचा व्यवसायाची चलती  आहे. वसाहतीतील अनेक बोअरवेलही नादुरुस्त अवस्थेत आहेत. ज्या सुरू आहे त्यावर सकाळपासून रांगा लागतात.  शहरात होत असलेला पाण्याचा अपव्यय टाळला तर पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या लोकांना वाया जाणारे पाणी मिळू शकेल.