News Flash

ऐन दुष्काळात ५० लाख लिटर पाणी दारू व अन्य कारखान्यांना देणे हा न्याय कसा?

जीवन जन्मापासून मृत्यूपर्यंत स्पर्धामय झाले आहेत.

  • ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांचा सवाल
  • प्राचार्य श्री.ल. पांढरीपांडे स्मृती व्याख्यानमाला

मराठवाडय़ात दुष्काळ पडलेला असताना ५० लाख लिटर पाणी दारूच्या आणि इतर कारखान्यांसाठी आपण देत असू, तर याला न्याय म्हणायचे काय, असा सवाल करून आपल्या अवतीभवती न्याय नाही, असे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी सांगून इतरांच्या जगण्यात आपल्या जगण्याचा अर्थ शोधायला हवा, असे प्रतिपादन त्यांनी केले.

प्रोफेसर कॉलनी मित्र मंडळाच्या वतीने प्राचार्य श्री.ल. पांढरीपांडे स्मृती व्याख्यानमाला भैयाजी पांढरीपांडे महाविद्यालयात रविवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर डॉ. वाय.एस. देशपांडे व पराग पांढरीपांडे उपस्थित होते.

जीवन जन्मापासून मृत्यूपर्यंत स्पर्धामय झाले आहेत. स्पर्धा कशासाठी, या जीवनाचा अर्थ काय, काहीच कळत नाही. केवळ शर्यतीत धावल्याप्रमाणे धावत सुटलो आहोत, असे ते म्हणाले. डॉ. बंग यांनी ग्रीस, इंग्लड, अमेरिका या देशांचे, तसेच विविध पुस्तकांचे संदर्भ देऊन आपल्या जीवनाला अर्थ देण्याची जबाबदारी आपलीच असल्याचे स्पष्ट केले.

हे जग मार्केटिंगचे आहे. यात ग्राहक हा राजा आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला अफाट शक्ती प्राप्त झाली आहे. जग बदलण्यासाठी मी कसा जगतो, कोणते कपडे घालतो, याबद्दलचे सावध निर्णय घेतल्यास जग बदलायला सुरुवात होईल.

मी खादीचे वस्त्र घालतो. कारण, यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळू शकतो. खादीचे वस्त्र तयार करणारे आणि त्यांच्या विक्रत्यांना लाभ होतो. आपण कशासाठी जगतो, याचे उत्तर स्वतला शोधायचे आहे. अवतीभवतीच्या लोकांच्या जगण्याचा गरजा पूर्ण करणे, हे जीवनाचे कर्तव्य आहे. दुसऱ्यांचे दुख बघून अश्रू गाळण्याने समाजाशी कनेक्ट होता येत नाही, तर त्यासाठी कृती करावी लागते. एक वकील न्यायालयात जात असताना कुणीतरी कोपऱ्यात कण्हत पडला होता. त्याला बघून त्यांच्या सुश्रुषात जीवन घालणारा तो वकील पुढे बाबा आमटे म्हणून प्रसिद्ध झाला, असे सांगून स्वत:ला शोधण्यासाठी समाजाशी नाळ जोडा. आजचे जग मला मान्य नाही. तो बदलणार, असा दृढनिश्चिय करा. त्यातून जीवनाचा अर्थ प्राप्त होईल, असेही ते म्हणाले.

संचालन आर्यन पांढरीपांडे यांनी केले. आभार पराग पांढरीपांडे यांनी मानले. संध्या दंडे यांनी भैय्याजी पांढरीपांडे यांचे स्मरण केले.

बळ नसलेल्यांचाही सन्मान व्हायचा

पूर्वी राजकीय बळ, आर्थिक बळ नसतानाही नागपुरात सन्मान मिळायचा. आता नागपुरातच नव्हे, तर इतर शहरातील अशा लोकांना सन्मान दिला जात नाही. बुद्धाने सांगितल्याप्रमाणे आपल्या दुखाचे मूळ कारण तृष्णा आहे. तृष्णा म्हणजे इच्छा. एक इच्छा पूर्ण होताच दुसरी इच्छा मनात जागी होते आणि माणूस दुखी होतो, असेही ते म्हणाले.

यूपीएससी, एमपीएसीचे नवे वेड

राज्यात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या १०० जागा आहेत, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ३०० जागा आहे, परंतु या दोन्ही परीक्षेची तयारी करण्यासाठी तरुणांना अक्षरश वेड लागले आहे. दरवर्षी पाच लाख तरुण या परीक्षेला बसतात. सत्तेची खुर्ची मिळाल्याशिवाय समाजासाठी काही करता येत नाही, असा समज त्यांचा झाला आहे. वास्तविक, जग बदल्यासाठी सत्तेची गरज नाही. मी स्वत बदललो की, जग आपोआप बदलते, हे त्यांनी स्पष्ट केले.

आदिवासींमध्ये भिकारी नाही

माणसाने कळपाने जगणे, ही निसर्गाची गरज आहे. प्रत्येकाच्या जिन्सवर ते लिहिले आहे. तशी बॉयोलॉजिकल प्रोग्रामिंग आहे. आदिवासींमध्ये हे प्रोग्रामिंग अद्याप विरळ झालेले नाही. आदिवासी लोक शेजारी जेवल्याशिवाय जेवत नाहीत. गेल्या ३० वर्षांत आदिवासींमध्ये भिकारी बघितला नाही, असेही डॉ. बंग म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2016 1:19 am

Web Title: water proving to liquor and other industry
Next Stories
1 चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक, वृद्ध आईचा मृत्यू, पोलीस गंभीर जखमी
2 विद्यार्थिनीवरील बलात्कार प्रकरणी अखेर शेजाऱ्यालाच अटक
3 ‘स्वाइन फ्लू’ने एकाचा मृत्यू
Just Now!
X