भूजल पातळीत कमालीची घट; ड्रायझोनमध्ये विंधनविहिरीला बंदी

नागपूर जिल्ह्य़ातील भूजल पातळीत कमालीची  (०.४६ मी) घट झाली असून नरखेड आणि काटोल तालुक्यात ती एक मीटरने खोल गेली आहे. त्यामुळे या भागात विंधनविहिरी खोदण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, कन्हान नदी आटल्याने सध्या कामठी खैरी प्रकल्पावरच नागपूर शहराच्या पाणीपुरवठय़ाचा भार असून त्यात जूनपर्यंत पुरेल इतकाच साठा  आहे. पावसाळा लांबला तर पाणी प्रश्न बिकट होण्याची शक्यता आहे.

उन्हाची तीव्रता वाढल्याने नागपूर शहर, ग्रामीण भाग आणि पालिकास्तरावरील गावांमध्ये पाणी संकट निर्माण झाले आहे.  कन्हान नदी आटल्याने सध्या नागपूर शहराला कामठी खैरी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. येथे ६७.१ एम.एम. क्युब इतका जलसाठा शिल्लक आहे. शहराला रोज ०.७ एमएमक्युब पाण्याची गरज आहे. त्यानुसार हा साठा जूनअखेपर्यंत पुरेल, त्यानंतर पावसाळा वेळेत सुरू झाला तर ठीक नाही तर यानंतर पुढच्या काळासाठी नियोजन करावे लागेल, असे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्ह्य़ाच्या भूजल पातळीतही घट झाली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या मार्च महिन्याच्या नोंदीनुसार ही घट सरासरी (०.४६ मी) इतकी आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा वर्षांतून चार वेळा सर्वेक्षण करते. त्यासाठी  पाणलोट क्षेत्रनिहाय निरीक्षण विहिरी निवड केली जाते. जिल्ह्य़ात अशा एकूण ११ विहिरी आहेत. पाच वर्षांपूर्वी तेथील पाण्याची पातळी ६.२१ मी. इतकी होती मार्च २०१९ मध्ये ती ६.६६ मी. खोल गेली हे येथे उल्लेखनीय.

सध्या जिल्ह्य़ात २८ टँकर सुरू असून भविष्यात ही संख्या १५२ पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्य़ातील  पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ४२.४० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असून त्याची जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंमलबजावणी  केली जात आहे. त्यासाठी त्यांना  ७ कोटी ८० लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला आहे, १३०० गावांमध्ये २३२८ उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यात प्रामुख्याने ४२३ नळयोजनांची दुरुस्ती, ३३५ विहिरींचे खोलीकरण,६०१ विहिरींचे अधिग्रहण व इतर योजनांचा समावेश आहे, असे मुद्गल म्हणाले.ह्ण

वाडीचा पाणी प्रश्न सुटणार

जिल्ह्य़ातील २० पालिका, नगरपंचायतींपैकी ११ ठिकाणी सध्या पाणी संकट आहे. त्यात वाडी आणि वानाडोंगरीचा समावेश आहे. वाडीचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी नवीन पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली असून ती पूर्ण झाली आहे. येत्या काही दिवसात तेथून पाणीपुरवठा सुरू केला जाईल. त्यानंतर तेथील समस्या दूर होईल, असे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी सांगितले.