पाच दिवसांआड पाणी; हातपंपही कोरडे

नागपूर : शहराचा विस्तार होत असताना आणि २४ तास पाणीपुरवठय़ाचा महापालिकेकडून दावा केला जात असताना सीमावर्ती भागातील वस्त्यांमध्ये पाणीपुरवठय़ाचा प्रश्न मात्र कित्येक वर्षांपासून कायम आहे. वाठोडा, दिघोरी नरसाळा, हुडकेश्वर या सीमाभागात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून तेथे दररोज शेकडो टँकर धावतात. टँकरच्या पाण्यावरच नागरिक त्यांची तहान भागवतात. भूजल पातळी खाली गेल्याने  हॅण्डपंप कोरडे पडले आहेत.

मागील वर्षी पुरेसा पाऊस न पडल्याने शहराला पाणीपुरवठा करणारी प्रमुख धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. भूजल पातळीही खाली गेली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात शहरात आणि शहराच्या सीमाभागातही जल संकट निर्माण झाले. नरसाळा-हुडकेश्वर भागात नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. दररोज २५० टँकर या भागात धावतात. म्हाळगीनगर पाण्याच्या टाकीसमोर  टँकरची जत्राच भरते. तेथून पाणी भरून टँकर परिसरातील वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा करतात. विशेष म्हणजे, दररोज धावणारे २५० टँकर प्रत्येक परिसरात पाच दिवस आड जातात. पाण्याचा टँकर येताच एकच धवपळ सुरू होते. ज्येष्ठांपासून गृहिणी आणि बच्चे कंपनी पाणी भरण्यास धडपड करतात. प्रत्येकाच्या घरासमोर आठ ते दहा ड्रम ठेवलेले  दिसतात. मात्र, हे पाणी त्यांना पाच दिवस पुरवावे लागते.

संभाजीनगर येथे गेल्या दोन वर्षांपासून पाण्याच्या टाकीचे काम  पूर्ण झालेले नाही. चिमोटे लेआऊटमध्ये जल वाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले असून नागरिकांना गेल्या पाच वर्षांपासून पाण्याची प्रतीक्षा आहे. बँक कॉलनी, ब्रम्हानगर, शंकरनगर, इंद्रनगर येथेही टँकरने पाणीपुरवठा केल्या जातो. रत्न लेआऊटमध्ये  फ्लॅटमध्ये खासगी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. वाठोडा येथून विहिरीत पाणी आणून फ्लॅटच्या टाकीत टाकण्यात येते.  दिघोरी आणि वाठोडामध्ये दीडशे टँकर धावतात. खरबी, आशीर्वादनगर, नेहरूनगर येथील नागरिकांनाही टँकरवरच अवलंबून राहावे लागते. वाठोडा भागात पंधरा वर्षांपूर्वी जलवाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. त्यापकी काही भागात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, अनेक भागात आजही टँकरनेच पाणीपुरवठा करण्यात येत आहे. महापालिकेतर्फे शहरात दररोज ३४६ टँकर धावत आहेत. गेल्या पाच वर्षांत टँकरची संख्या कमी झालेली नसून त्याची मागणी वाढतच आहे.

कुलरसाठी पाणी नाही

नागपूरचे तापमान ४३ ते ४४ अंश सेल्सियपर्यंत गेले असून उकाडय़ापासून सुटका करण्यासाठी घरोघरी कुलर लागले आहेत.  वाठोडा, दिघोरी, नरसाळा या  वस्त्यांमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे  कुलरसाठी पाणी आणावे कोठून असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे कुलर शोभेची वस्तू ठरली आहे

गेल्या २३ वर्षांपासून आम्ही या भागात राहतो. अजूनही टँकरनेच पाणीपुरवठा केला जातो. पिण्याचे आणि बाहेर वापराचे पाणी एकाच टँकरने येते. पाणी अशुद्ध असते. तीन वर्षांपूर्वी या परिसरात जलवाहिन्या टाकण्यात आल्या. मात्र, नळाला एकदाही पाणी आले नाही. घरी बोरवेल आहे मात्र, पाण्याची पातळी पन्नास फूट खाली गेल्याने ती कोरडी पडली आहे. टँकरही पाच दिवसांआड येतो. त्यामुळे मर्यादित पाणी वापरावे लागते.’’

– कृष्णराव वंजारी, संत ज्ञानेश्वरनगर नरसाळाह्ण

मागील वर्षी आमच्या भागात जलवाहिन्या टाकण्यात आल्या.  मात्र अजूनही नळाला पाणी नाही. घरा शेजारीच जलकुंभ आहे. तो सध्या बंद आहे. त्यामुळे टँकरच्या पाण्यावरच आमची तहान भागते. बारा वर्षांच्या काळात या भागात पाण्यासोबतच इतर कोणतीही आवश्यक सुविधा नाही.

– रमेश येरेकर, चिमोटे लेआऊट