मानव-वन्यजीव संघर्षांत जंगलातून पकडलेल्या वाघ आणि बिबटय़ांच्या पुनर्वसनाबाबत तसेच वाघांच्या अनाथ झालेल्या पिल्लांचे पालनपोषण, प्रशिक्षण आणि त्यांना निसर्गात मुक्त करण्याबाबत राज्यस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे.

राज्यातील मानव-वन्यजीव संघर्ष कमी होण्याऐवजी वाढत आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ात वाघांचा तर नाशिक जिल्ह्य़ात बिबटय़ांसोबत मानवांचा संघर्ष वाढतच असल्याने त्यांना जेरबंद करण्याचे प्रमाणही वाढत आहे. गेल्या दोन महिन्यात चंद्रपूर जिल्ह्य़ातून चार वाघांना जेरबंद करण्यात आले. गोरेवाडा बचाव केंद्रात त्यांची रवानगी करण्यात आली. त्यातील दोन वाघांचा केंद्रातच मृत्यू झाला. दहा वाघांना ठेवण्याची क्षमता असणाऱ्या या केंद्राची क्षमता पूर्ण झाली आहे. त्यामुळे नवीन पाहुणा आला तर काय, हा प्रश्न कायम आहे. दुसरीकडे नाशिकमध्येही तीन बिबट जेरबंद करण्यात आले आणि त्यांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बचाव केंद्रात पाठवण्यात आले. २०१६ ला मानव-वन्यजीव संघर्षांत जेरबंद केलेल्या वाघाच्या बाबतीतच निर्णय घेण्याचा अधिकार समितीला होता. ही समिती आता नव्याने गठित करण्यात आली आहे. आईपासून दुरावलेल्या बछडय़ाची योग्य ती व्यवस्था करण्याबाबत ही समिती प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना शिफारस करेल. या बछडय़ाची निसर्गात आईशी भेट करून देण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यास त्याला कुठे ठेवायचे, निसर्गात मुक्त करण्यासाठी प्रशिक्षित करायचे का,  याबाबत ही समिती त्यांना सल्ला देईल. प्रशिक्षण निश्चित झाल्यास प्रशिक्षण कुठे द्यायचे, त्याची देखभाल कशी करायची, किती दिवसात आणि  त्याला निसर्गमुक्त कुठे करायचे, निसर्गात मुक्त करण्यासाठी अधिवास निश्चित केल्यास त्या अधिवासाचे मूल्यांकन करून ही समिती तिचा अभिप्राय सादर करेल. जेरबंद केलेला वाघ किंवा इतर प्रकरणात बचाव केलेला वाघ यांना निसर्गमुक्त करावे किंवा कसे, याबाबत ही समिती प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना शिफारस प्रस्तावित करेल.

अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पूर्व बी.एस. हुडा यांच्या अध्यक्षतेत गठित या समितीत सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ए.डी. खोलकुटे, राज्य वन्यजीव मंडळाचे दोन्ही सदस्य किशोर रिठे व कुंदन हाते, गोरेवाडा वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. शिरीष उपाध्ये, सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी गिरीश वशिष्ठ हे सदस्य असून गोरेवाडा प्राणिसंग्रहालय व बचाव केंद्राचे विभागीय व्यवस्थापक हे पदसिद्ध सदस्य तसेच वन्यजीव विभागाचे विभागीय वनाधिकारी हे पदसिद्ध सदस्य सचिव आहेत.