विमानतळानंतर थेट बर्डीलाच थांबा; अनेक स्थानकांची कामे अर्पूणच

निवडणुकीच्या ऐन तोंडावर सुरू करण्यात आलेल्या मेट्रो रेल्वेबाबतची लोकांमधील उत्सुकता आता कमी झाली असल्याने मोजक्याच प्रवाशांसह मेट्रोचा प्रवास सध्या खापरी-ते बर्डी या मार्गावर सुरू आहे.

खापरी ते बर्डी या टप्प्यातील मेट्रो रेल्वेचे उद्घाटन निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी घाईघाईत झाले. पहिल्या टप्प्यातील खापरी ते विमानतळ (दक्षिण) या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. तेथील स्थानकेही परिपूर्ण आहेत. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनीही या सहा किलोमीटर अंतरावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, नंतरच्या म्हणजे विमानतळ (दक्षिण) ते सीताबर्डी या दरम्यान मार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी स्थानकासह इतरही काही कामे होणे शिल्लक आहेत. रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या पाहणीनंतर महामेट्रोने या मार्गावरून प्रवाशी वाहतूक सुरू केली. मात्र येथे मेट्रो अतिशय संथगतीने धावते. मध्ये स्थानक नसल्याने ती विमानतळ (दक्षिण) या स्थानकावरून थेट बर्डीलाच थांबते.

मेट्रो सुरू झाल्यानंतर उत्सुकतेपोटी पहिले दोन दिवस नागपूरकरांनी प्रवासासाठी मोठी गर्दी केली. त्यानंतर काहीच दिवसात उत्साह मावळला. निवडणूक प्रचार काळात मेट्रोचा मुद्दा ऐरणीवर होता. मात्र, दुसरीकडे प्रवाशांची चणचण असे विरोधाभासी चित्र होते. त्यातच दर आठवडय़ात एक वेळा दर सोमवारी देखभाल दुरुस्तीसाठी मेट्रो बंद ठेवण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला. रेल्वेस्थानकावरून प्रवाशांना त्यांच्या गंतव्य स्थानी जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून महामेट्रोने जीपीएस प्रणालीवर आधारित सायकल आणि बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकीची व्यवस्था केली. मेट्रोच्या सर्व स्थानकांवर वायफायची सुविधा आहे. गाडी सुद्धा संपूर्ण वातानुकूलित आहे. सुरक्षेची हमी आहे. तरीही रविवार, शनिवार वा सुटीचा दिवस सोडला तर इतर वेळी मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे.

खापरी, नवीन विमानतळ ही दोन रेल्वेस्थानके मुख्य रस्त्यापासून लांब आहेत. विमानतळ स्थानकाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने चिंचभुवनच्या प्रवाशांना तेथून मेट्रोने जाणे अवघड आहे. अशीच अवस्था खापरी रेल्वेस्थानकाची आहे. हे स्थानकही गावात आहे. मुख्य रस्त्यावरून जाण्यासाठी प्रवाशांना मोठा फेरा मारून जावे लागते. दुसरीकडे मुख्य रस्त्यावरून धावणाऱ्या शहर बसेस आणि इतर खासगी वाहने या भागातील नागरिकांना सहज उपलब्ध होते. त्यामुळे ते मेट्रोऐवजी बस किंवा खासगी वाहनांचाच वापर करतात. मेट्रोची गती संथ असणे हे सुद्धा एक प्रमुख कारण असल्याचे प्रवासी सांगतात. सध्या खापरी, नवीन विमानतळ, विमातळ (दक्षिण) आणि विमानतळ ही पाच भव्य स्थानके उभी आहेत. रात्री तेथील दिव्यांच्या प्रकाशाने ती चकाकतात. मात्र आत प्रवाशांचा शुकशुकाट असतो, असे चित्र आहे.

महामेट्रोचे प्रयत्न सुरू

प्रवाशांची संख्या कमी आहे ही बाब खरी आहे. ती वाढावी म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. महामेट्रोने केलेल्या सर्वेक्षणानुसार, मिहानमध्ये विविध कंपन्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या १४ हजार तर अप्रत्यक्ष रोजगार मिळालेल्यांची संख्या ३८ हजार आहे. शिवाय वर्धा मार्गावर अनेक महाविद्यालये सुद्धा आहेत. महामेट्रोकडून या सर्व कंपन्या आणि महाविद्यालयाशी संपर्क साधला जात आहे.  विशेष म्हणजे, कुठलीही नवीन गोष्ट स्वीकारण्याला उशीर लागतो. लोकांची मानसकिता बदलावी लागते. महामेट्रो प्रशासनाचे प्रयत्न सातत्याने सुरू असून मेट्रोसाठी प्रवासी मिळतील अशी आम्हाला खात्री आहे, असे महामेट्रोतील सूत्रांनी सांगितले.