News Flash

आरोग्य विभाग फक्त १० लाखांमध्येच कुष्ठरुग्ण शोधणार!

उपराजधानीत आजारावर नियंत्रण मिळणार कसे?

उपराजधानीत आजारावर नियंत्रण मिळणार कसे?

केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येक वर्षी कुष्ठरोग शोधमोहीम राबवण्यासह या रुग्णांच्या उपचारावर कोटय़वधींचा खर्च केला जातो, परंतु त्यावर नियंत्रण सोडाच, पण १०० टक्के रुग्णही शोधण्यात आरोग्य विभागाला यश आलेले नाही. शहरातील लोकसंख्या व येथे विविध कामांसह शिक्षणाकरिता आलेल्यांची संख्या ३० ते ३५ लाखांच्या घरात असतांना आरोग्य विभागाकडून यंदा केवळ १० लाख लोकांत कुष्ठरोग शोधल्या जाणार आहे. तेव्हा शहरातील १०० टक्के रुग्ण सापडणार कसे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

केंद्र व राज्य शासनाकडून कुष्ठरोग नियंत्रणासाठी विविध योजना राबवल्यावरही महाराष्ट्रासह देशाच्या काही राज्यांत त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळाले नाही. नागपूर जिल्ह्य़ात आक्टोबर २०१४ च्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार कुष्ठरोगाचे ६०४ रुग्ण शिल्लक होते. त्यांच्यावर उपचार सुरू होता. त्यात १ नोव्हेंबर २०१४ ते ३१ ऑक्टोबर २०१५ पर्यंतच्या एक वर्षांत तब्बल ९३९ रुग्णांची भर पडली. त्यात ४ लहान मुलांचाही समावेश होता. ही संख्या प्रत्येक वर्षी जिल्ह्य़ात सुमारे १ हजार राहते.

२०१५-१६ च्या अभ्यासानुसार महापालिका हद्दीत प्रती लाख लोकांमध्ये १०.९४ कुष्ठरुग्ण, तर ग्रामीण भागात प्रत्येक लाख लोकांमध्ये २०.५६ रुग्ण आढळले आहे. हे रुग्ण प्रामुख्याने नागपूर शहरासह ग्रामीण भागातील झोपडपट्टय़ा, चाळी, दुर्गम भाग, वीटभट्टी व मजूर अड्डय़ांसह अनेक भागातील आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. केंद्र सरकारने १९ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान देशभरात कुष्ठरोग शोधमोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत या शहरातील २६ नागरी कुष्ठरोग केंद्राच्या मदतीने १० लाख नागरिकांमध्ये हा आजार शोधण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. अभियानाकरिता सार्वजनिक आरोग्य विभागाने महापालिकेतील आरोग्य विभागासह सामाजिक संस्था व अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार आहे, त्यामुळे ७०० अंगणवाडी सेविका व २०० सामाजिक कार्यकर्त्यांसह एकूण ९५० हून जास्त मनुष्यबळ आरोग्य विभागाला मिळणार आहे.

या सगळ्यांसह महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागाकडून प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. या सगळ्यांचे प्रत्येकी २ जणांचे (१ महिला व १ पुरुष) ४५० पथके नियुक्त केले जाणार असून प्रत्येकाला प्रती दिवस २० ते २५ घरात सव्‍‌र्हेक्षणाचे लक्ष दिले जाणार आहे. येथे कुणी संशयित कुष्ठरुग्ण आढळल्यास त्याला उपचाराकरिता २६ पैेकी एका नागरिक कुष्ठरोग केंद्रावर पाठवले जाईल. शहरातील भौगोलिक स्थिती बघता १० लाख लोकांपर्यंतही हे पथक पोहोचणे शक्य नसल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. त्यातही ही शोधमोहीम शहरातील केवळ झोपडपट्टी आणि मागास भागात राबवली जाणार असून आरोग्य विभागाकडून शंकरनगरसह इतर महत्वाचे भाग वगळले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कुष्ठरोग म्हणजे काय?

कुष्ठरोग हा कुष्ठजंतूमुळे (मायको बॅक्टेरिअम लेप्रे) होणारा सांसर्गिक आजार आहे. कुष्ठरोग अनुवांशिक नसून या आजाराबद्दल आजही समाजात गैरसमज आहेत. ग्रामीण, आदिवासी पाडय़ांसह अनेक भागात आजही कुष्ठरुग्ण आढळल्यास त्यावर उपचाराकरिता पूजाअर्चा, नवस फेडणे, जडीबुटी, मंत्रतंत्र हाच उपाय केला जातो, पण योग्य वैद्यकीय उपचारानेच हा आजार बरा होऊ शकतो. त्यातच सांसर्गिक कुष्ठरोगाच्या जंतूचा प्रसार हवेच्या माध्यमातून होऊ शकतो. त्यावर नियंत्रणाकरिता काळजी घेण्याची गरज आहे.

संवेदनशील भागच घेतला

कुष्ठरोग शोधमोहिमेचा पूर्वीचा अनुभव बघितला, तर उच्चभ्रू भागात नागरिक तपासणीसाठी या पथकाला सहकार्य करत नाही. तसेच या भागात काही त्वचाविकार दिसल्यास नागरिक त्वरित डॉक्टरांकडे जातात. तेव्हा शहरातील झोपडपट्टी व रुग्ण आढळणारे संवेदनशील भागांचा समावेश करून १० लाखांवर नागरिकांची तपासणी करण्याचे लक्ष्य आहे. गरज भासल्यास त्यात वाढही केली जाईल. कमी मनुष्यबळामुळे आरोग्य विभागालाही काही मर्यादा आहेत.

डॉ. चहांदे, जिल्हा कुष्ठरोग अधिकारी, नागपूर

 

कुष्ठरोगाची लक्षणे

  • अंगावरील त्वचेच्या रंगापेक्षा फिक्कट, लालसर कुठलाही डाग
  • त्वचेला कोरडेपणा येतो व भेगा पडतात.
  • संबंधित भागात सुन्नपणा (बधिरता) येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2016 12:13 am

Web Title: what is leprosy
Next Stories
1 ‘फ्लाईंग क्लब’ परवान्याच्या प्रतीक्षेत
2 ‘गरिबांची सेवा हाच मदर तेरेसांचा संदेश’
3 ‘गोंदिया इसेन्स ऑफ इंडिया’ आणि ‘सारस वैभव गोंदियाचे’ माहितीपटाचे प्रकाशन
Just Now!
X