‘मेडिकल, मेयो, एम्स’वरच भार टाकण्याचा प्रयत्न;  कामाचा ताण वाढत असल्याने डॉक्टरांमध्ये रोष

नागपूर : नागपूर महापालिकेने गाजावाजा करत कळमेश्वर रोडवर ५ हजार खाटांचे कोविड केअर सेंटर (सीसीसी) उभारले, परंतु एकही रुग्ण तेथे दाखल होत नाही. आमदार निवासातील सीसीसी रुग्णांनी भरल्यावर लोकसत्ताने काही रुग्णांच्या गैरसोयीचा प्रकार पुढे आणल्यावर नवीन सीसीसीचा शोध प्रशासन घेत आहे. येथे (सीसीसी) साध्या एक्सरे व रक्त तपासणीची सोय नसल्याने हा साध्या चाचणीचाही भार मेडिकल, मेयो, एम्सवर टाकला जात आहे. यामुळे येथील तज्ज्ञ डॉक्टरांमध्ये रोष वाढत आहे.

भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदेकडून (आयसीएमआर) प्रत्येक जिल्ह्य़ात बाधितांवर उपचारासाठी विलगीकरण केंद्र, सीसीसी, कोविड रुग्णालये कसे असावे यासह इतर निकष ठरवत तातडीने ते तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या. नागपूर महापालिकेने तातडीने कळमेश्वर रोडवर सुमारे ५ हजार खाटांचे कोविड केअर सेंटर उभारून पूर्ण झाल्याचा दावा केला. त्याचवेळी महापालिकेच्या पाच रुग्णांचे अद्ययावतीकरण करत तेही सज्ज असल्याचे दर्शवले गेले. परंतु प्रत्यक्षात शहरात एकही लक्षणे नसलेल्या बाधितांना या सीसीसीमध्ये ठेवले जात नाही. दरम्यान, मेडिकल, मेयो, एम्सच्या डॉक्टरांवर कामाचा भार वाढत आहे.

मेडिकल, मेयो, एम्स ही टर्शरी दर्जाची रुग्णालये असल्याने येथे अत्यवस्थ संवर्गातील रुग्णांनाच दाखल करून उपचार अपेक्षित आहे. हा प्रकार तिन्ही रुग्णालय प्रशासनाने वारंवार मांडल्यावर प्रशासनाकडून आमदार निवासात पहिले सीसीसी सुरू झाले. येथील जागा काही दिवसांत रुग्ण वाढल्याने भरली. दरम्यान, मेडिकल, मेयोत विविध वार्ड सुरू करून प्रशासन तेथे लक्षणे नसलेल्या बाधितांना ठेवून वेळ काढत आहे. येथे काही प्रमािणात रुग्णांची गैरसोयही होत आहे. दरम्यान ‘सीसीसी’मध्येच लक्षणे नसलेल्या बाधितांचे एक्स-रे, रक्त तपासणीची सोय अपेक्षित आहे. सुरुवातीला विभागीय आयुक्त कार्यालयातील एका बैठकीत या विषयावर चर्चाही झाली होती. याप्रसंगी रक्त तपासणीसाठी एखाद्या खासगी कंपनीसोबत करार करून अत्यल्प दरात चाचणी शक्य असल्याचेही पुढे आले होते. प्रत्यक्षात हल्ली रुग्ण  वाढत असल्याने त्याकडे दुर्लक्ष करत या साध्या चाचणीचाही भार मोठय़ा प्रमाणात अत्यवस्थ रुग्ण असलेल्या मेडिकल, मेयो, एम्सवर टाकला जात आहे. निश्चितच त्यामुळे डॉक्टरांचे सर्वाधिक श्रम या साध्या चाचणीवर वाया जात असल्याने ते मानसिकदृष्टय़ा थकल्यास अत्यवस्थ रुग्णांवर सूक्ष्म निरीक्षण ठेवून उपचारासाठी नवीन तज्ज्ञांची फळी प्रशासन कुठून अणणार हा प्रश्न खुद्द डॉक्टर उपस्थित करत आहेत.

शहरात अकराशेहून अधिक सक्रिय रुग्ण

उपराजधानीत २२ जुलैच्या सायंकाळी ६ वाजता १,११९ सक्रिय रुग्ण मेडिकल (२७६ रुग्ण), मेयो (२५५ रुग्ण), एम्स (५० रुग्ण), कामठीतील रुग्णालय (१८ रुग्ण), खासगी रुग्णालय (३२ रुग्ण), आमदार निवासातील सीसीसी (३४१ रुग्ण), मध्यवर्ती कारागृहातील सीसीसी (६० रुग्ण) दाखल होऊन उपचार घेत होते, तर ८७ जणांना दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मेडिकल, मेयो, एम्समध्ये सुरुवातीला करोनाबाधितांची संख्या कमी असल्याने लक्षणे नसलेल्यांनाही दाखल केले जात होते. परंतु आता अत्यवस्थ रुग्ण वाढत असतानाही हे रुग्ण सीसीसीमध्ये दाखल होणे अपेक्षित असताना मेडिकल, मेयो या रुग्णालयांतच वार्ड वाढवले जात आहे.

मेडिकल, मेयो, एम्स रुग्णालयातील करोनाबाधित रुग्णांचा भार कमी करण्यासाठी सीसीसी सुरू करून आमदार निवासात सुमारे ३५० लक्षणे नसलेल्या बाधितांना तेथे ठेवले आहे. सीसीसीची संख्या आणखी वाढवली जात आहे. परंतु चाचणी अहवालानंतर प्रत्येकाची एक्स-रे आणि रक्ताच्या तपासणीची सोय सध्या मेडिकल, मेयो, एम्समध्येच करावी लागेल. सीसीसीमध्ये ही सोय केल्यास टेक्निशियनसह इतरही बऱ्याच गोष्टींची जुळवाजुळव सध्या शक्य नाही.’’

– राम जोशी, अतिरिक्त आयुक्त, नागपूर महापालिका.