मंगळवारी कंपनीची निवड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्यासाठी दोन खासगी कंपन्यांनी निविदा सादर केल्या असून ही जबाबदारी कोणत्या कंपनीला मिळणार  हे येत्या मंगळवारी स्पष्ट  होण्याची शक्यता आहे. दोन्ही कंपन्यांच्या निविदाची पाहणी करून त्यासंदर्भातील अहवाल व जबाबदारी कोणत्या कंपनीला मिळणार हे मंगळवारीच स्पष्ट होईल.

नागपूर विमानतळ मिहान इंडिया लि. (एमआयएल) आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त कंपनीकडे आहे. हे विमानतळ  अत्याधुनिक करणे, दुसरे टर्मिनल आणि इतर सुविधा विकसित करण्यासाठी त्याचे खासगीकरण करण्यात येत आहे. जीएमआर एअरपोर्ट्स आणि जीव्हीके या दोन कंपन्यांनी त्यासाठी निविदा भरली आहे. जीएमआरची निविदा सर्वाधिक दराची असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या कंपनीला विमानतळ हस्तांतरित होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी या संपूर्ण प्रक्रियेसाठी एमआयएलने  सल्लागार नेमला आहे. ही सल्लागार कंपनी प्राप्त निविदांचा अभ्यास आणि मूल्यांकन करीत आहेत. त्याचा अहवाल येत्या मंगळवारी सादर होण्याची शक्यता आहे.  एमआयएलच्या बोर्डासमोर हा अहवाल मंजुरीस येईल. त्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील पीएमआयसी (प्रोजेक्ट मॉनिटरिंग अँड इम्प्लेमेंशन कमिटी)च्या मंजुरीकरिता तो पाठवण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया महिनाभरात पूर्ण होईल आणि संबंधित कंपनीला विमानतळ हस्तांतरित करण्याच्या कार्यवाहीला प्रारंभ होईल. विमानतळ विकसित करण्यासाठी खासगी कंपनी नेमण्याची प्रक्रिया साडेतीन वर्षांपासून सुरू आहे. प्रारंभी या विमानतळाबाबत कुणीही रूची दाखवली नव्हती. एमआयएलने अटी आणि शर्ती शिथिल केल्यानंतर पाच कंपन्यांनी निविदा भरल्या. त्यातील दोन कंपन्यांनी अंतिम निविदेत सहभाग घेतला.

सार्वजनिक-खासगी भागीदारातून विमानतळ विकसित करणे, संचलित करणे आणि त्याचे व्यवस्थापन करण्याचा हा प्रकल्प आहे. त्यासाठी खासगी कंपनी आणि एमआयएलची संयुक्त कंपनी स्थापन करण्यात येईल. त्यात एमआयएलचा २६ टक्के आणि उर्वरित वाटा खासगी कंपनीचा राहणार आहे. ही कंपनी ३० वर्षे विमानतळ संचलित करणार आहे. यासाठी संबंधित कंपनीला १६८६ कोटी रुपयांच्या गुंवतणूक करायची आहे. एमआयएल गुंतवणूक म्हणून अस्तित्वातील विमानतळ आणि विमानतळाची संपूर्ण जमीन देणार आहे. खासगी कंपनीला दुसरी धावपट्टी आणि पायाभूत सुविधा विकसित कराव्या लागतील. त्यात पॅसेंजर आणि कार्गो टर्मिनलाचा समावेश आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विमानतळ विकसित करण्यासाठी कंपनी नियुक्त करण्याची प्रक्रिया अतिशय संथ गतीने होत असल्याबद्दल अधिकाऱ्यांसमोर नाराजी व्यक्त केली आहे, परंतु मोठा प्रकल्प असल्याने प्रक्रियेतील कोणताही टप्पा वगळून चालणार नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

ई अँड वाय’ या सल्लागार कंपनीला प्राप्त निविदांचे मूल्यांकन करण्यास सांगण्यात आले आहे. ती प्रक्रिया सुरू आहे. मूल्यांकन अहवाल आल्यानंतर एमआयएल भूमिका घेऊ शकणार आहे.

– सुरेश काकाणी, अध्यक्ष, एमआयएल बोर्ड