सावनेर विधानसभा मतदारसंघ

जिल्ह्य़ात काँग्रेसकडे असलेल्या एकमेव सावनेर मतदारसंघात विद्यमान आमदार सुनील केदार यांच्या विरुद्ध भाजप कोणाला उमेदवारी देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष  लागले आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश मानकर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष राजीव पोद्दार ही दोन नावे या जागेसाठी चर्चेत आहेत.

१९९५ ते २०१४ या काळात १९९९ चा अपवाद वगळता येथून सुनील केदार विजयी झाले आहेत. १९९९ मध्ये भाजपचे देवराव आसोले यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर प्रयत्न करूनही भाजपला येथे विजय मिळवता आला नाही. मतदारांशी थेट संपर्क, सहकार क्षेत्रावरील पकड आणि लढाऊ वृत्ती यामुळे केदार यांनी या मतदारसंघावर त्यांची पकड कायम ठेवली आहे. २०१४ च्या निवडणुकीत सर्वत्र मोदी लाट असताना सावनेरमधून मात्र केदार यांनी काँग्रेसला विजय मिळवून दिला. हा विजय निसटता होता. या निवडणुकीत भाजपचे अधिकृत उमेदवार सोनबा मुसळे यांचा अर्ज ऐनवेळी बाद झाला. केदार यांचे पारंपरिक विरोधक व माजी मंत्री रणजीत देशमुख यांचे पुत्र आशीष देशमुख यांना त्यावेळी भाजपने उमेदवारी नाकारली होती. या दोन्हीचा फायदा केदार यांना झाला होता.

२०१४ नंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस आणि विशेषत: केदार गटाला या मतदारसंघात अपेक्षित यश मिळू शकले नाही. त्यामुळे भाजपने ही जागा यावेळी जिंकायचीच, असा प्रण केला आहे. मात्र त्याला पक्षातील वरिष्ठ पातळीवरून कशी साथ मिळते यावरच सर्व निर्भर असणार आहे.

केदार यांचे वडील दिवंगत बाबासाहेब केदार यांना भाजप नेते नितीन गडकरी हे गुरूस्थानी मानत. सुनील केदार यांचेही गडकरींशी सलोख्याचे संबंध कायम आहेत. या दोघांच्या मैत्रीवरून केदार भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होते. याही वेळी ती झाली. पण, केदार यांनी त्याचा इन्कार केला.

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून पुन्हा केदार हेच प्रबळ दावेदार असले तरी पक्षाकडे उमेदवारी मागणाऱ्यांची यादी मोठी आहे. ही संख्या पक्षातील गटबाजी दर्शवते. केदार यांचा शहरातील राजकारणातही सहभाग असल्याने येथील एक गट त्यांच्या विरोधात आहे. मात्र आजवरची केदार यांची राजकीय वाटचाल बघितली तर ती पक्षांतर्गत विरोधकांवर मात करूनच पुढे गेल्याचे दिसून येते.

भाजपकडून रमेश मानकर आणि राजीव पोद्दार ही दोन नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. मानकर यांनी यापूर्वी येथून निवडणूक लढवली होती. पोद्दार पाच वर्षांपासून तयारी करीत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका सावनेरचा उमेदवार ठरवताना महत्त्वाची असणार आहे.