मार्डच्या वसतिगृहात खळबळ

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)मध्ये कान-नाक-घसा विषयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला असलेल्या डॉ. अश्विनी राऊत (२६)ने आज गुरुवारी सकाळी मार्डच्या वसतिगृहात स्वत:च्या गळ्याची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार वसतिगृहातील इतर सहकाऱ्यांना कळताच खळबळ उडाली. या महिला डॉक्टरला त्वरित मेडिकलमधील अतिदक्षता विभागात हलवण्यात आले असून तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

अश्विनी मार्डच्या वसतिगृहात खोली क्रमांक ३२ मध्ये राहत होती. आज सकाळी नऊच्या सुमारास ती कोणाशीतरी भ्रमणध्वनीवर बोलत होती. संभाषण पूर्ण होताच तिने आपला भ्रमणध्वनी जोरात जमिनीवर फेकला आणि लगेच शल्यक्रियेच्या ब्लेडने स्वत:चा गळ्याची नस कापून घेतली. खोलीतून काही तरी पडल्याचा आवाज आल्याने शेजारच्या डॉक्टरांनी खिडकीतून डोकावून पाहिले. त्यांना डॉ. अश्विनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. निवासी डॉक्टरांनी तिला तातडीने अपघात विभागात हलवले.

वरिष्ठ डॉक्टरांकडून तिच्यावर शल्यक्रिया केली गेली. मोठय़ा प्रमाणात रक्तस्राव झाल्याने अश्विनीला तातडीने रक्त दिले गेले. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या अश्विनीला मेडिकलमधील अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर (जीवनरक्षक प्रणालीवर) ठेवण्यात आले आहे. तिची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. प्रशासनाकडून मात्र या विषयावर बोलण्यासाठी कुणीही तयार नाही. कौटुंबिक कलहातूनच तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा मेडिकलमध्ये सुरू आहे, परंतु पोलिसांच्या तपासातच या प्रकरणाची वास्तविक माहिती पुढे येईल.

वर्षभरातील तिसरी घटना

मेडिकलमध्ये एका विद्यर्थ्यांने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर २५ मे रोजी एमबीबीएसच्या तृतीय वर्षांत शिकणाऱ्या अशवंत खोब्रागडे या भावी डॉक्टरने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. आता डॉ. अश्विनीच्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे येथे सेवा देत असलेले भावी डॉक्टरच तणावाखाली वावरत असल्याचे पुन्हा नव्याने समोर आले आहे.

मानसोपचार तपासणी कधी?

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने प्रत्येक वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मानसोपचार चाचणी सक्तीची केली आहे. परंतु मेडिकल, मेयोसह जवळपास सर्वच शासकीय रुग्णालयांत त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आत्महत्येचा विचार मनात घोळत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती प्रशासनाच्या निदर्शनात येत नाही. अशा स्थितीत आत्महत्या करून कुणी दगावल्यास त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.