महिला प्रवाशांच्या मदतीने प्रसूती

नागपूर : फलाटावर लागलेल्या गाडय़ांची उद्घोषणा सुरू होती. गाडी पकडण्यासाठी प्रवाशांची लगबग. अचानक बाळाचा आवाज प्रवाशांच्या कानावर पडतो आणि  पावले थबकतात. आवाज आलेल्या दिशेने नजरा वळतात. मग कुणीतरी सांगतो बाळ जन्मले. ही घटना नागपूर रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक २ वर सोमवारी सकाळी पावणेअकरा वाजता घडली.

दिल्लीहून हैदराबादकडे जात असलेल्या एका महिलेला प्रवासादरम्यान असह्य़ प्रसूती कळा आल्याने ती नागपूर स्थानकावर उतरली. असह्य़ वेदनांनी विव्हळत असलेल्या महिलेला बघून सहप्रवासी महिला तिच्या मदतीला धावल्या. एका महिलेने बॅगमधून साडी काढली आणि दुसऱ्या महिलेच्या मदतीने त्या महिलेच्या सभोवती साडी लावली. काही मिनिटातच महिलेने बाळाला जन्म दिला.

ही महिला अंदमान एक्सप्रेसने नामपल्ली (हैदराबाद) जात होती. तिच्यासोबत तिची तीन छोटी मुले होती. गाडीतून उतरताच तिला प्रसूती कळा येऊ लागल्या. तिची अवस्था पाहून कुणीतरी रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांना कळवले. निरीक्षक आर.आर. जेम्स यांनी महिला आरक्षक अश्विनी मूलतकर यांना घटनास्थळाकडे रवाना केले.

तसेच स्थानकाचे उपअधीक्षक पंकज कुमार यांनाही कळवले आणि डॉक्टराची व्यवस्था करण्याची विनंती केली. डॉक्टर घटनास्थळी पोहचण्या आधीच महिलेने बाळाला जन्म दिला.

त्यानंतर या महिलेला इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही ३२ वर्षीय महिला नामपल्ली (हैदराबाद) येथील असून ती दिल्लीहून नामपल्लीला जाण्यासाठी सर्वसाधारण डब्यातून प्रवास करीत होती.