नर्सिग महाविद्यालयाच्या नव्या वास्तूचे उद्घाटन

संस्था स्थापनेचे उद्दिष्ट आणि साध्य करावयाचे लक्ष्य याचे भान ठेवून संस्थेने कार्यरत राहणे अपेक्षित असते, अनेकदा संस्था सुरळीत चालायला लागल्यावर आणि साधनसंपत्तीची वाढ झाल्यावर अनेकांना याचे भान राहात नाही. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था याला अपवाद आहे. संस्थेने महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय असून, बदलत्या परिस्थितीत संस्थेने महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात अधिक समर्थपणे वाटचाल करावी, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या मिहान परिसरातील सीताबाई नरगुंदकर नर्सिग महिला महाविद्यालयाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन रविवारी डॉ. भागवत व ‘दी इंडियन एक्सप्रेस प्रा.लि.’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक गोएंका यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद गोऱ्हे, उपकार्याध्यक्ष एन.डी. पाटील. सचिव डॉ. पी.व्ही.एस. शास्त्री, नागपूर प्रकल्पाचे अध्यक्ष मिलिंद कुकडे, प्राचार्य रूपा वर्मा आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

संस्थेची आजवरची वाटचाल आणि त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातील केलेल्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढताना भागवत यांनी पुढच्या वाटचालीबाबत काही सूचनाही केल्या. महर्षी कर्वे यांनी कुठलीही अपेक्षा न बाळगता समाजिक कार्यात स्वत:ला झोकून दिले होते. संस्थेचा उद्देशच महिला सशक्तीकरणाचा होता. पूर्वी महिलेला देवी मानूूनही एका विशिष्ट चौकटीत बंदिस्त केले जायचे. आता प्रत्येक क्षेत्रात त्या पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत.

देशात ५० टक्के महिला समाज असून  त्यांना रोजगारक्षम केल्यावरच त्यांच्यात सशक्तीकरणाची भावना निर्माण होईल. ही बाब ओळखूनच संस्थेने त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी नवनवे उपक्रम राबवावे, असे भागवत म्हणाले.

देशभरात महिलांची स्थिती एकसारखीच असेल, असे नाही. प्रत्येक भागात वेगवेगळी असू शकते. ही स्थिती लक्षात घेऊन त्यांच्या सशक्तीकरणाचे काम करण्याची गरज आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

यावेळी नवी वास्तू उभारणीत योगदान देणाऱ्या किरण कन्स्ट्रक्शनच्या वृषाली देवधर, वास्तुविशारद गुरुनाथ मोडक, शिरीष देवधर, समीर गलगलीकर, सुनील पाटील यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रमोद गोऱ्हे यांनी, संचालन कविता गोमासे यांनी, तर आभार प्राचार्य रूपा वर्मा यांनी मानले. नर्सिग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

संस्थेचे काम प्रसार माध्यमांनी शिकण्यासारखे -विवेक गोएंका

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इंडियन एक्स्प्रेस प्रा. लि.चे अध्यक्ष व कार्यकारी संचालक विवेक गोएंका यांनीही संस्थेच्या कामाबद्दल गौरवोद्गार काढले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व संस्थेतील पदाधिकाऱ्यांचे काम आणि संस्थेप्रती असणारी त्यांची आपुलकी खरोखरच अतुल्य आहे. यापासून प्रसार माध्यमांनी बरेच काही शिकण्यासारखे आहे. या संस्थेचे सदस्य आहोत याचा अभिमान वाटावा, असे त्यांचे कार्य आहे, असा उल्लेख करून त्यांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या.