ब्रिटिशकालीन मध्यवर्ती संग्रहालयातील वन्यजीवांच्या ‘ट्राफीज्’ (पेंढा भरलेले वन्य प्राणी आणि त्यांचे अवयव) तत्कालीन संग्रहालय प्रशासनाला जपता आल्या नाहीत. संवर्धन प्रक्रियेअभावी खराब झालेल्या या ‘ट्राफीज्’ जाळून नष्ट करण्यात आल्या. मात्र, राज्याच्या वन्यजीव विभागाकडे अजूनही दुर्मीळ अशा वन्यजीवांच्या ‘ट्राफीज्’ आहेत. संग्रहालयातील ‘ट्राफीज्’सारखी त्यांची अवस्था होऊ नये म्हणून अहवाल तयार करण्यात येत आहे.

राज्यातील वन खात्यात सुमारे ११ विभाग आहेत. या प्रत्येक विभागातील कार्यालयात वाघ, बिबटय़ा, बायसन आदी प्राण्यांच्या ‘ट्राफीज्’ आहेत. त्यावर वैज्ञानिकदृष्टय़ा संवर्धन प्रक्रिया न केल्यास त्यांचीही अवस्था मध्यवर्ती संग्रहालयातील वन्य प्राण्यांच्या ‘ट्राफीज्’सारखी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टीनेच राज्याच्या वन्यजीव विभागाने कोणत्या विभागात किती आणि कशाच्या ‘ट्राफीज्’ आहेत, याची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी या सर्व ११ विभागांना माहिती पाठवण्यासंदर्भात पत्र देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक कार्यालयातील क्षेत्राअंतर्गत कोणत्या कुटुंबाकडे वन्यजीवांच्या ‘ट्राफीज्’, कातडी, त्यांच्या अवयवांपासून बनलेल्या वस्तू आहेत का, याचीही माहिती मागवण्यात आली आहे.

नागपूर वन खात्यातही प्रादेशिक कार्यालयात एक मोठा वाघ आणि उपवनसंरक्षक कार्यालयात रानगव्याची ‘ट्राफीज्’ आहे. या दोन्ही ‘ट्राफीज्’च्या संवर्धनाची प्रक्रिया सुरू आहे. राज्यात अनेक कुटुंबांकडे परंपरागत वन्यजीवांच्या ‘ट्राफीज्’, त्यांची कातडी, त्यापासून तयार झालेल्या वस्तू आहेत. दरवर्षी त्याची माहिती वन खात्याला देणे अनिवार्य आहे. अशा ‘ट्राफीज्’ आणि वस्तू बाळगणाऱ्यांनी वन खात्याकडून त्याबाबतचे प्रमाणपत्र मिळवावे, असे परिपत्रक केंद्र सरकारने २००१ मध्ये काढले होते. मात्र, अजूनही लोकांना या नियमांची माहिती नाही.

कारवाईची तरतूद : केंद्राच्या परिपत्रकानुसार प्रमाणपत्राशिवाय ‘ट्राफीज्’ बाळगणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. त्या दृष्टीने आता राज्याच्या वन्यजीव विभागाने पाऊल उचलले आहे. ज्या लोकांनी या वस्तूंवरील मालकीहक्काचे प्रमाणपत्र सादर केले नाही, अशांवर नियमानुसार कारवाईदेखील होऊ शकते. त्यामुळे आता वन खात्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांकडील वन्यजीव ‘ट्राफीज्’चा अहवाल तयार होणार आहे. यात अनेक दुर्मीळ वन्य प्राण्यांच्या ‘ट्राफीज्’देखील असू शकतात. अशा वेळी हा वारसा जतन करणे महत्त्वाचे आहे. त्याच्या संवर्धनासाठी आणि पुढील पिढीला हा वारसा सोपवण्यासाठी त्यावर जतन प्रक्रिया होणेही आवश्यक आहे, अशी अपेक्षा वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.