रुग्णसंख्येत मुंबईनंतर नागपूरचा क्रमांक; आज जागतिक फुफ्फुस दिवस

राज्यात एक लाख लोकसंख्येच्या मागे ९ नागरिकांना फुफ्फुसाचा कर्करोगाची लागण होत असल्याचे दिसून आले आहे. नागपुरात हे प्रमाण ८.८ असल्याचे भारतीय कर्करोग संस्थेच्या नोंदणीतून पुढे आले आहे. रुग्णसंख्येत मुंबईनंतर नागपूरचा क्रमांक लागतो. २५ सप्टेंबरला जागतिक फुफ्फुस (लंग्ज) दिन  आहे. जगात साडेसहा कोटींच्या जवळपास नागरिक श्वास नलिकेशी संबंधित आजाराने ग्रस्त असून त्याचा थेट फुफ्फुसांवर परिणाम होतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार या रुग्णांतील सुमारे ३० लाख व्यक्ती प्रत्येक वर्षी दगावतात. एक कोटी नागरिकांना क्षयरोग असल्याचे निदान होते.  फुफ्फुसाच्या कर्करोगामुळेही १६ लाख रुग्ण दगावतात. प्रदूषणामुळे भारतात अस्थमाचे रुग्ण वाढत आहे. जगात या आजाराचे ३ कोटी २४ लाख रुग्ण असून त्यात लहान मुलांचीही संख्या १४ टक्के आहे. श्वसनरोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास भविष्यातील मोठा धोका टाळता येतो.

भारतीय कर्करोग संस्थेच्या अभ्यासानुसार देशात विविध  कर्करोगांपैकी सुमारे सात टक्के रुग्ण हे केवळ फुफ्फुसाच्या कर्करोगाचे असतात. त्यातील अनेक रुग्ण हे दुसऱ्या किंवा तिसऱ्या श्रेणीत उपचारासाठी येत असल्यामुळे त्यांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. देशातील ग्लोबोकॉन या संस्थेच्या आकडय़ानुसार प्रत्येक लाखांमागे देशात सुमारे सात रुग्ण फुफ्फुसाच्या कर्करोगाचे आढळतात. तर भारतीय कर्करोग सोसासटीच्या नोंदणीनुसार महाराष्ट्रात प्रत्येक एक लाख नागरिकांच्या मागे ९ नागरिकांना फुफ्फुसाचा कर्करोग होतो. यात मुंबईत प्रत्येक एक लाख लोकसंख्येच्या मागे १० जणांना तर नागपुरात ८ जणांमध्ये हा आजार आढळतो. भारतीय कर्करोग रुग्ण नोंदणीची सोय  देशातील सर्व रुग्णालयांत नाही. त्यामुळे सध्याच्या संख्येच्या तुलनेत ही संख्या आणखी जास्त असण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रात वर्तवली जात आहे.

नागपूर जिल्ह्य़ात कोराडी, खापरखेडा येथे औष्णिक वीजनिर्मिती केंद्र आहे, तर शहरात एकाच वेळी मेट्रो, सिमेंट रस्त्यासह इतरही कामे सुरू आहेत. त्यामुळे हवेत धूलिकण वाढले आहे. त्यामुळे राज्याच्या इतर भागाच्या तुलनेत नागपुरात अस्थमासह फुफ्फुसाशी संबंधित रुग्ण वाढले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेने पुरेशी काळजी घेतली व  नागरिकांनी तोंडावर रुमाल ठेवल्यास आजारावर नियंत्रण शक्य आहे.   – प्रा. डॉ. सुशांत मेश्राम, श्वसनरोग विभाग प्रमुख, मेडिकल, नागपूर.