विधानसभेतील यशामुळे काँग्रेसच्या आशा वाढल्या

नागपूर : विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना सर्व पक्षांना सामोरे जावे लागणार असून विधानसभेचे निकाल बघता भाजपला ही निवडणूक जड जाण्याची तर काँग्रेससाठी सत्तेत परत येण्याच्या संधीचे संकेत देणारे आहे.

नागपूर जिल्हा परिषदेत एकूण ५९ जागा होत्या. वाडीचे सर्कल नगरपंचायतीत परावर्तित झाल्याने जागांची संख्या एकने कमी होऊन ती ५८ वर आली आहे. सध्या भाजपकडे २१ व सेनेकडे ६ अशा एकूण २७ जागा आहेत. अपक्ष व छोटय़ा पक्षाच्या मदतीने भाजपने पाच वर्षांपेक्षा अधिक काळ येथे सत्ता राबवली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ग्रामीणमध्ये भाजपला सहापैकी केवळ दोनच जागा मिळाल्या. त्यांच्याकडे २०१४ मध्ये पाच जागा होत्या. ही संख्या तीनने कमी झाली. काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ होऊन त्या दोन झाल्या. एक जागा सेना बंडखोराला मिळाली. एक जागा राष्ट्रवादीनेजिंकली. रामटेकमधून सेना बंडखोर निवडून आला असला तरी त्यांना मिळालेली मते ही सरकारच्या नाराजीच्या विरोधातली होती हे येथे उल्लेखनीय. जनमताचा कौल लक्षात घेतला तर आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला सत्ता कायम ठेवायची असेल तर अधिक परिश्रम करावे लागणार आहे.

दुसरीकडे उमरेड, काटोल आणि सावनेर हे तीन मतदारसंघ सध्या काँग्रेस व राष्ट्रवादीकडे आहे. कामठी आणि हिंगणा या दोन जागा भाजपने जिंकल्या. यापैकी हिंगण्यातील उमेदवाराला चाळीस हजारावर मताधिक्य आहे. मात्र, कामठीतून भाजपला निसटता विजय मिळाला आहे. यातून जनमताचा कौल हा सरकार विरोधी आहे हे स्पष्ट होते. लोकसभा निवडणुकीत रामटेकची जागा शिवसेनेने जिंकली होती. यावेळी कृपाल तुमाने यांना ग्रामीणमधील सर्वच विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तुलनेत चांगले मतदाधिक्य मिळाले होते. ते विधानसभा निवडणुकीत कायम राहिले नाही.

विधानसभेतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून भाजपचे जिल्हाध्यक्ष व सावनेरमधून पराभूत झालेले राजीव पोतदार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्रामीण भागावर चांगली पकड होती. त्यांना उमेदवारी नाकारल्याने ग्रामीण भागातील त्यांच्या समर्थकांचा मोठा गट भाजपवर नाराज आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत झाडून सर्व काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केल्याने मरगळलेल्या संघटनेला नवे बळ मिळाले आहे. त्याचा फायदा जि.प. च्या निवडणुकीत या पक्षांना होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्य़ात काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे. त्याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतपेटीत काँग्रेसच्याबाजूने पडलेले दिसतील व जिल्हा परिषदेत काँग्रेसच सत्ता स्थापन करेल असा विश्वास, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुनीता गावंडे यांनी व्यक्त केला.

‘‘विधानसभा निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केले. त्यामुळे आमच्या  जागा वाढल्या तसेच पक्षाच्या मतांची टक्केवारी सुद्धा वाढली. परिणामी, कार्यकर्त्यांचा उत्सह वाढला. याचा फायदा आम्हाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निश्चित होईल.’’

– प्रकाश वसू, उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस