दयाशंकर तिवारी यांची माहिती
महापालिकेच्या वतीने पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले. शहरातील विविध भागातील तलावांवर १ लाख, ७८ हजार, ७०१ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले असून १५० टन निर्माल्य गोळा करण्यात आले आहे. अजूनही तलावांवर निर्माल्य गोळा करण्याचे काम सुरू असून २२० ते २३० टनच्या जवळपास निर्माल्य गोळा होईल, अशी माहिती सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील सर्वच झोनमध्ये कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यावेळी कृत्रिम तलावांमध्ये गणपतीचे विसर्जन मोठय़ा प्रमाणात करण्यात आले. एकूण १५५ कृत्रिम तलाव करण्यात आले होते आणि शहरातील विविध भागात आणि तलावांच्या काठावर निर्माल्य गोळा करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती.
विविध स्वयंसेवी संस्थांनी निर्माल्य गोळा करण्यासाठी पुढाकार घेतला असला तरी तलावांमध्ये अनेक लोकांनी निर्माल्य टाकल्याचे दिसून आले. कनक रिसोर्ससने ३४ वाहनासह नव्वद कर्मचारी या कामासाठी लावले होते.
विविध तलावात विसर्जन करण्यात आलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्ती गोरेवाडा, पाचगाव आणि गिट्टीखदान या भागातील खाणीमध्ये संग्रहित केल्या जाणार असून त्याची सुरुवात झाली आहे. महापालिकेचे १० झोनल अधिकारी, ७५ आरोग्य निरीक्षक, १४४ जमादार, कनकचे १०८ कर्मचारी या कामात लागले होते, असेही तिवारी यांनी सांगितले.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना खत देणार
शहरात मोठय़ा प्रमाणात निर्माल्य गोळा करण्यात आले असून त्यातील निर्माल्य आणि अन्य कचरा वेगळा करण्यात येत आहे. निर्माल्यापासून खत निर्मितीचे काम अंबाझरी उद्यान, धंतोली उद्यान आणि सक्करदरातील आयुर्वेदिक कॉलेज परिसरात केले जात आहे. अरण्य या संस्थेला ३ ट्रक निर्माल्य देण्यात आले असून त्यापासून २० ते २५ टन खताची निर्मिती केली जात आहे. ते खत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना निशुल्क देण्यात येणार आहे. शिवाय अंबाझरी आणि धंतोली उद्यानात तयार करण्यात येणाऱ्या खताचा उपयोग महापालिकेच्या उद्यानांसाठी करण्यात येणार आहे.
तलाव स्वच्छता मोहीम
गणपती विसर्जनानंतर सीएमसीए, स्वच्छ नागपूर, रोटरी क्लब एलिट, नॅशनल सिव्हील डिफेन्स कॉलेज, महापालिका, नासुप्र आय क्लीन, इग्नाइट मॅगझीन या संस्थांच्या कार्यकत्यार्ंसह १० शाळांतील ४०० विद्यार्थ्यांनी फुटाळा तलाव स्वच्छता मोहीम राबविली. नव्या पिढीमध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने जागृती व्हावी आणि प्रदूषण थांबविण्यासाठी एक प्रगतिशील पाऊल म्हणजे आपले शहर हे स्वच्छ असणे गरजेचे आहे ही भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने तलाव स्वच्छता मोहीम राबविली.