गोंदिया : आधीच पुनर्वसनासारखा गुंतागुंतीचा विषय, त्यावरही हातावरचे जगणे, आज पोट भरलं तर उद्याचे काय ?, अशा अवस्थेत कसेबसे आयुष्याचा गाडा हाकणारे नागणडोह पाड्यातील आदिवासी दिवाळीच्या तोंडावर आपल्या घरापासून दूर बोरटोला येथे दिवस काढत आहेत. १२ ऑक्टोबरच्या रात्री रानटी हत्तींच्या कळपाने पाड्यावर हल्ला चढवला. तेथील घरांची व पिकांची नासधूस केली. हत्तींच्या हैदोसामुळे येथील ग्रामस्थांना बोरटोला येथे हलवण्यात आले. या कटू घटनेला नऊ दिवस उलटले तरी रानटी हत्तींची दहशत तेथे कायमच आहे.

हेही वाचा >>>नागपूर : ऐन सणासुदीत भेसळयुक्त अन्नपदार्थांचा पुरवठा !, सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

वनविभागाकडून बांबू कटाईची ५ महिने मिळणारी कामे, रोजनदारीची कामे व जवळील शेतीच्या भरवशावर आपला आयुष्याचा गाडा हाकणाऱ्या नागणडोह येथील आदिवासीचे १२ कुटुंब आपल्या घराला मुकले आहेत. पाड्यातील एकूण लोकसंख्या ५५, त्यात १५ पुरुष, १४ महीला २६ लहान-मोठी मुले-मुली. या सर्वांनी १२ ऑक्टोबरच्या रात्री कसाबसा आपला जीव वाचवला. दुसऱ्या दिवशी पाडयाचे दृश्य भयावह होते. प्रशासनाने या सर्वांना बोरटोला येथे हलवले. येथील जी.प. शाळेत त्यांच्या राहण्या व जेवणाची सोय केली. जोपर्यंत या रानटी हत्तींचा कळप या परिसरातून निघून जात नाही तो पर्यंत नागणडोह येथे जाण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>नागपूर : जेरबंद बिबट्याने घेतला मोकळा श्वास

या घटनेला आता ९ दिवस उलटले, दिवाळीसारखा सण तोंडावर असूनसुद्धा त्यांना आपले गाव गाठता येत नाही. गोंदिया जिल्ह्याचे हे शेवटचे गाव. गावाला जायला धड रस्ते नाही. पण त्याबद्दल कसलीही कुरकुर नाही. यानंतर गडचिरोली जिल्हा सुरू होतो. हे हत्ती इतरत्र हलवणार, अशी ग्वाही जिल्ह्यात भेटीला आलेल्या वनमंत्र्यांनी दिल्यामुळे ग्रामस्थांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. पण, या हत्तींचा येथील मुक्काम वाढला आणि ते कधीपर्यंत येथे वास्तव्यास राहतील, याचाही काही नेम नाही. पाड्यातील ५५ ग्रामस्थ गेल्या नऊ दिवसांपासून हत्तींच्या दहशतीखाली बोरटोला गावातील शाळेत आश्रयाला आहेत.

हेही वाचा >>>नागपूर : महिलेशी मैत्री करून तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वन विभागाच्या नियमानुसार त्यांना नुकसान भरपाई मिळेल, पंचनामे तयार करण्यात आलेले आहेत. पण जोपर्यंत या रानटी हत्तींचे कळप या परिसरापासून लांब जात नाही तोपर्यंत या ग्रामस्थांना नागणडोह येथे जाता येणार नाही. हत्तींचे कळप गडचिरोली जिल्ह्यात गेल्यानंतर पुन्हा गोंदिया जिल्ह्यात दाखल होत असल्याचे आतापर्यंतच्या निरीक्षणातून समोर आले आहे. यामुळे सध्या वनविभागाने ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली असल्याचे नवेगावबांधचे वन परिक्षेत्राधिकारी दादा राऊत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.