नागपूर : दक्षिण आफ्रिकेतून १२ चित्त्यांची दुसरी तुकडी शनिवारी नियोजित वेळेनुसार मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात दाखल झाली. भारतीय वायू सेनेचे सी-१७ ग्लोबमास्टर कार्गो विमान शनिवारी सकाळी दहा वाजता ग्वाल्हेर विमानतळावर उतरले. तेथून चित्त्यांना भारतीय वायू सेनेच्या एमआय-१७ हेलिकॉप्टरने श्योपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले. दुपारी १२.३० च्या सुमारास त्यांना विलगीकरणात सोडण्यात आले.

सप्टेंबर २०२२मध्ये पाच मादी आणि तीन नर चित्त्यांचा समावेश असलेली पहिली तुकडी भारतात दाखल झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत १७ सप्टेंबरला त्यांच्या वाढदिवशी या आठही चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात विलगीकरण कक्षात सोडण्यात आले. त्यानंतर सात नर आणि पाच मादी चित्त्यांना शनिवारी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत विलगीकरण कक्षात सोडण्यात आले.

तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेतील राष्ट्रीय जैवविविधता संस्थेसाठी त्यांचे डीएनए नमुने घेण्यात आले. भारतात आणण्यापूर्वी या १२ पैकी तीन चित्त्यांना दक्षिण आफ्रिकेतील फिंडा, क्वाझुलू-नटल येथे, तर नऊ चित्त्यांना रुईबर्ग, लिम्पोपो येथे वेगळे ठेवण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिनाभर विलगीकरणात कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांसाठी दहा विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. त्यांचा विलगीकरण कालावधी सुमारे एक महिन्याचा असेल. या काळात ते तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली असतील. कुनो राष्ट्रीय उद्यानात आता १२ चित्त्यांची भर पडल्याने भारतातील चित्त्यांची संख्या आता २० झाली आहे.