राम भाकरे, नागपूर

संपूर्ण शहरातील कचरा जेथे साठवला जातो, त्या भांडेवाडीतील डम्पिंग यार्डमध्ये दीड वर्षांत १४ वेळा आगी लागल्या. सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना न केल्याने हा प्रकार सारखा घडतो, असे या परिसरातील नागरिक सांगतात.

शहरात दररोज निर्माण होणारा १२०० टन कचरा भांडेवाडीमध्ये साठवला जातो. डम्पिंग यार्डच्या आजूबाजूलाच दाटीवाटीने लोकवस्त्या आहेत. कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण आणि नियमित लागणाऱ्या आगी मुळे हा भाग असुरक्षित आहे. त्यावर नियंत्रणासाठी कुठलीच यंत्रणा नसल्याने परिसरातील सुमारे १५ वस्त्यांमधील नागरिक भयभीत वातावरणात राहतात.

शहरासोबत कचऱ्याचे प्रमाणही वाढत गेले. शहराच्या पूर्व सीमेला लागून असलेल्या कचराघराच्या पूर्वेला बिडगाव आणि उर्वरित दिशेला १५ वस्त्या आहेत. हवेमुळे परिसरात कचरा उडतो. पावसाळ्यात चिखल तयार होतो. कचऱ्यात मिथेन गॅस तयार होतो व तो पेट घेत असल्याने आगीच्या घटना सातत्याने घडतात. त्यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे सुमारे २ किमी अंतरावरील वस्त्यांमधील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या दीड वर्षांत या ठिकाणी १४ वेळा आगी लागल्या असून या आगी विझवण्यासाठी अग्निशमन विभागाच्यावतीने गाडय़ा पाठवल्या जातात. पाच पाच दिवस तेथील आग शमत नाही. आगीचे कारण एकदाही समोर आले नसल्यामुळे महापालिका या विषयावर गंभीर नसल्याचे समोर आले आहे.  महापालिकेने डम्पिंग यार्डच्या सुरक्षेसाठी केवळ ११ सुरक्षा रक्षक नियुक्त केले आहे. ते त्यांच्या निर्धारित जागेवर राहात नाहीत. त्यामुळे परिसरात कोणीही प्रवेश करू शकतो.

‘‘आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाला कसरत करावी लागते. सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी खासगी कंपनीवर आहे. आग लागली की किमान १५ ते २० आगीचे बंब त्या ठिकाणी पाठवण्यात आले आहे. ’’

– पी.पी चंदनखेडे, अग्निशमन अधिकारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भांडेवाडी परिसरात डम्पिंग यार्डमध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली आहे. एकूण २२ सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी आहेत. आगी लागल्यानंतर त्या ठिकाणी तात्काळ अग्निशमन विभागाला कळवले जाते. जागोजागी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.

– कमलेश शर्मा, व्यवस्थापक, कनक र्सिोसेस,