यशवंतराव चव्हाण मुख्य विद्यापीठाकडून पदवी वितरित करून गौरव
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या १४ बंदीवानांनी बी.ए. अभ्यासक्रमाची पदवी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. रविवारी, १४ मे रोजी त्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांच्या हस्ते कारागृहात आयोजित एका सोहळ्यात पदवी प्रदान करून गौरवण्यात आले.
समारंभाला प्रामुख्याने कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, संचालक डॉ. प्रकाश अतकरे, प्रा. अरविंद बोंद्रे, मगन पाटील, अनिल थोरात, भांडार व्यवस्थापक व कारागृहाच्या अधीक्षक श्रीमती राणा भोसले, वरिष्ठ तुरुंगाधिकारी ए.आर. गावीत उपस्थित होते. कुलगुरू डॉ. वायुनंदन म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीकरिता शिक्षण महत्त्वाचे आहे. विविध अभ्यासक्रमातील ज्ञान प्राप्त करण्याकरिता मन लावून अभ्यास करण्याची गरज आहे. कारागृहातील बंदीवानांनी बी.ए. पदवी घेऊन तेही शिक्षणात मागे नसल्याचे दाखवून दिले आहे. कारागृहाच्या अधीक्षक श्रीमती राणी भोसले यांनी याप्रसंगी बंदिवाना मार्गदर्शन करून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाला कारागृहाचे तुरुंगाधिकारी के.बी. मिराशे उपस्थित होते. संचालन योगेश पाटील यांनी केले, तर आभार संजीव हटवादे यांनी मानले.
बंदिवानांच्या उच्च शिक्षणासाठी १० संगणक
मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांना आणखी शिक्षण घेता यावे म्हणून विद्यापीठाकडून येथे योगा प्रमाणपत्र, संगणक प्रमाणपत्र, उच्च पदवी यासारखे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. त्याकरिता येथे १० संगणक उपलब्ध करून देण्याची घोषणा, कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी केली.
पदवीधर बंदिवान
अमर महाजन, प्रभाकर मंडलेकर, रामू डवरे, संजय मून, रवींद्र चौधरी, अंतरिक्ष उके, देवानंद महाकाळकर, सुभाष पंधरे, बाबू वर्मा, योगेश चव्हाण, अमित शिंदे, महेश शिंदे, उमाशंकर पोटभरे, मारोती सडमाके.