अमरावती : ‘बहुजन सुखाय’ सोबतच ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन वाटचाल करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाला सध्या मोठ्या प्रमाणात निघणाऱ्या भंगार बसेसच्या आव्हानाला तोंड द्यावे लागत आहे. गेल्या तीन वर्षांत १४९ बसेस भंगारात काढाव्या लागल्या. आता येत्या मार्च अखेर आणखीन ३४ बसेस भंगारात जाणार आहेत. यामुळे प्रशासनाला प्रवाशांना बससेवा देताना कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे गेल्या दीड वर्षांत अमरावती जिल्ह्यातील आगारांना केवळ २० नवीन बसेस मिळाल्या आहेत.

अनेक बसेसही जुन्या झाल्यामुळे भंगार बसमधूनच प्रवाशांना जावे लागत आहे. नोंदणीनंतर पंधरा वर्षांचा कालावधी ओलांडला तर संबंधित बसही भंगारात काढावी लागते. अगोदरच बसेसची संख्या कमी असल्यामुळे आणि भंगार बसेसचे प्रमाण वाढल्यामुळे आता अमरावतीच्या एसटी महामंडळाकडे ३१६ बसेसच उरल्या आहेत. यातील अनेक बसेसनी पंधरा लाख कि.मी.चा प्रवास देखील पूर्ण केला आहे. प्रवाशांची वाढती संख्या व नादुरुस्त बसेसचे प्रमाण पाहता, अमरावती जिल्ह्यासाठी नवीन बसगाड्यांची गरज आहे. तसा प्रस्ताव देखील शासनाकडे पाठविला असून हा विषय प्रलंबित राहिला आहे. अमरावती जिल्ह्याला किमान यावर्षी २७१ बसेसचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
तीन वर्षांपूर्वी ४६५ बसेस जिल्ह्यात असताना वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्या वाढण्याऐवजी घटल्या आहेत. त्यामुळे केवळ ३१६ बसेसवर जिल्ह्यातील प्रवाशांचा भार आहे. तीन वर्षांपूर्वी असलेल्या बसेसच्या तुलनेत १४९ बसेस कमी झाल्याने एसटी महामंडळाला नियोजन करताना डोकेदेखी होत आहे.

हेही वाचा – नागपूर शहर बनले नशाखोरीचे केंद्र, वर्षभरात ३ कोटींचे अंमली पदार्थ जप्त

खासगी वाहतूक व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढल्याने हा प्रवासी आपल्याकडे ओढण्याकरिता एसटी महांडळाकडून देखील प्रयत्न करण्यात आले. यामध्ये निमआराम बसेससह वातानुकुल शिवशाही बसेसदेखील एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखेल झाल्या. अशातच आता एसटीच्या ताफ्यात नव्या इलेक्ट्रिक गाड्या दाखल होत आहेत. परंतु, ही स्पर्धा करीत असताना अलीकडे साध्या बसेसची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या बसगाड्यांवर सर्व गाडा एसटी महामंडळाला चालवावा लागत आहे.

हेही वाचा – स्टेट बँक ऑफ इंडियाची १५ हजार कोटींची फसवणूक; तीन वर्षांतील तपशील माहिती अधिकारातून समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वसामान्य प्रवाशांची निकड लक्षात घेता अमरावती विभागात राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती, बडनेरा, परतवाडा, दर्यापूर, चांदूरबाजार, मोर्शी, वरूड आणि चांदूर रेल्वे या आठ एसटी आगारांत सन २०१९ मध्ये ४६५ बसेस प्रवाशांच्या दिमतीला होत्या. त्या तुलनेत अमरावती विभागाला १४५ गाड्यांची कमतरता असल्याने एसटी प्रशासनाला नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे एसटी बसगाड्यांच्या कमतरतेमुळे मात्र प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.