चंद्रपूर : जिल्ह्यात जानेवारी ते मे २०२३ या पाच महिन्यांच्या कालावधीत ३५५ अपघाताच्या घटना घडल्या. यात १५४ नागरिकांचा बळी गेला. विशेष म्हणजे, मागील वर्षीच्या तुलनेत रस्ते अपघातात १७ टक्क्यांनी घट झाली आहे.
जिल्ह्यातील अपघातांची संख्या व त्यात होणाऱ्या मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे गठन करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पहिल्या पाच महिन्यांत अपघातांच्या घटनांसह मृत्यूंच्या संख्येत २९ टक्क्यांची घट झाली आहे. २०२२ मध्ये जानेवारी ते मे या पहिल्या पाच महिन्यांत जिल्ह्यात ४१५ अपघात झाले होते. यावर्षी अपघातांची संख्या ३५५ आहे. अपघाताच्या संख्येत १७ टक्क्यांची घट झाली आहे. २०२२ मध्ये याच कालावधीत २१८ जणांचा मृत्यू झाला होता. २०२३ मध्ये मृत्यूचा आकडा १५४ आहे. मृत्यूच्या संख्येत २९ टक्के घट झाली असून गतवर्षीच्या तुलनेत ६४ लोकांचे जीव वाचले आहेत.
तसेच जानेवारी ते मे या कालावधीत २०२२ मध्ये ‘ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह’चे २१६ प्रकरण दाखल करण्यात आले होते. २०२३ मध्ये ही संख्या ३८१७ वर गेली आहे. २०२२ मध्ये ‘सिटबेल्ट’ न लावल्याबद्दल ४६०८ प्रकरण, २०२३ मध्ये ही संख्या १०२७६ वर, गतवर्षी हेल्मेट न घालणे ७०९९ प्रकरण, २०२३ मध्ये १५६६८ प्रकरण तसेच २०२२ मध्ये एकूण मोटर वाहन प्रकरणाची संख्या ४१०७६ होती. यावर्षी पहिल्या पाच महिन्यांत ही संख्या ५६५५६ वर गेली आहे.