पारंपरिक विषयांच्या महाविद्यालयांचीच भर; विनाअनुदानित तत्त्वावरील महाविद्यालये मात्र बंद होण्याच्या मार्गावर
केंद्र शासन व्यावसायिक, कौशल्यपूर्ण शिक्षणाची एकीकडे हाकाटी पिटत असताना दुसरीकडे खेडय़ात पारंपरिक विषयांचीच महाविद्यालये, नवीन विद्याशाखा, अभ्यासक्रम, तुकडय़ांना प्राधान्य दिले जात असल्याचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०१६-१७साठी पात्र ठरवलेल्या १६ महाविद्यालयांवरून दिसून येते. कायम विनाअनुदानित तत्त्वावरील अनेक महाविद्यालये बंद होण्याच्या मार्गावर असताना नवीन महाविद्यालयांना शासन आणि विद्यापीठ स्तरावरून मान्यता दिली जात आहे.
महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये सर्वात जास्त महाविद्यालये नागपूर विद्यापीठाला संलग्नित आहेत. त्यात येत्या शैक्षणिक वर्षांत आणखी चार समाजकार्य महाविद्यालयांची भर पडणार आहे. सर्वात जास्त बी.एड., एम.एड., बीपीएड, महाविद्यालये नागपूर विद्यापीठाला संलग्नित आहेत. ग्रामीण किंवा दुर्गम भागात आजही पारंपरिक विषय घेऊनच विद्यार्थ्यांना शिकावे लागत असून व्यावसायिक आणि कौशल्यपूर्ण शिक्षणापासून विद्यार्थी कोसो दूर आहेत. कला शाखेत शिक्षण घेऊन रोजगाराच्या संधी मर्यादित असल्याचे माहिती असतानाही त्यांना दुसरे पर्याय नाहीत. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही आमदार, राजकारण्यांची महाविद्यालये आहेत.
सव्वा चार लक्ष विद्यार्थी आणि शेकडो संलग्नित महाविद्यालयांचा डोलारा सांभाळत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडे संस्थाचालकांनी पारंपरिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये, तुकडय़ा, विद्याशाखांचीच मागणी केली आहे. सध्या ७६७ महाविद्यालये नागपूर विद्यापीठाला संलग्नित असून त्यात आणखी १६ महाविद्यालयांची भर पडणार आहे. महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाकडे २०१६-१७मध्ये ४० नवीन महाविद्यालये, नऊ विद्याशाखा, १८ अभ्यासक्रम, सात विषय, अतिरिक्त तुकडय़ा १९, व्यावसायिक पारंपरिक अभ्यासक्रम तीन आणि व्यावसायिक अभ्यासक्रम एक असे ९७ प्रस्ताव ‘बीसीयूडी’ला प्राप्त झाले असून त्यामधील त्रुटी बीसीयुडीने संबंधितांना कळवल्या आहेत. कुही तालुक्यात चार महाविद्यालये आहेत. त्यात पायाभूत सुविधा न देता एकच विद्यार्थी अनेक ठिकाणी दाखवण्याच्या क्लृप्त्या संस्था चालक लढवत असतात. शासनाने हळूहळू ऑनलाईन शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्यावर वचक बसवणे सुरू केले आहे. तसेच बी.एड., एम.एड., बी.पी.एड. एम.पी.एड. महाविद्यालयांची शासन पातळीवर तपासणी आरंभली असल्याने यातून अनेक कायम विनाअनुदानित महाविद्यालये बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात येते. या संदर्भात विद्यापीठाचे बीसीयूडी संचालक डॉ. दिनेश अग्रवाल म्हणाले, काही अभ्यासक्रम आधी एक वर्षांचे होते. नंतर ते दोन वर्षांचे झाले. नंतर सेमिस्टर पॅटर्न आला. त्यात बी.एड., बी.पी.एड. किंवा इतर विषयांच्या महाविद्यालयांना एनसीटीईने घालून दिलेल्या निकषांची पूर्तता महाविद्यालयांना करता आली नाही. त्यामुळे अनेक कायम विना अनुदानित महाविद्यालये बंद होऊ शकतात.