अकोला : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षात मोठी चढाओढ लागली आहे. पक्षातील १९ जण निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत. त्यातील १५ जणांनी एक गट तयार केला असून आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी द्या, त्यांना निवडून आणण्याची आम्ही एकत्रित जबाबादारी घेतो, असे लेखी पत्रच त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे सादर केले आहे. त्यामुळे अकोला पश्चिममधून काँग्रेसकडे आता १५ विरूद्ध ४ असे चित्र निर्माण झाले आहे.

दोन दशकांपासून एकही आमदार नाही

अकोला जिल्ह्यात गेल्या दोन दशकांपासून विधानसभेवर काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही. आगामी निवडणुकीत जिल्ह्यात किमान एक जागा निवडून आणण्याचे आव्हान काँग्रेसपुढे आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात ज्येष्ठ नेते तथा दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांनी तब्बल २९ वर्षे भाजपचा झेंडा फडकवत ठेवला. त्यांचे ३ नोव्हेंबर २०२३ रोजी निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त आहे. २०१९ मध्ये काँग्रेसने कडवी झुंज दिली होती. शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये आघाडी घेत भाजपने दोन हजार ३६९ मतांनी निसटता विजय मिळवला. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपची १२ हजार ७१ मतांनी पीछेहाट झाली. त्यामुळे अकोला पश्चिममध्ये काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

हेही वाचा : लोणार सरोवरावर धुक्याची चादर

साजिद पठाणांची पुन्हा दावेदारी

२०१९ व त्यानंतर रद्द झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण यांना उमेदवारी दिली होती. आता देखील त्यांच्यासह काँग्रेसकडे १९ इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील इंटकचे प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप वखारिया, माजी आमदार बबनराव चौधरी, माजी महापौर मदन भरगड, रमाकांत खेतान, विवेक पारसकर, चंद्रकांत सावजी आदींसह एकूण १५ जणांनी एक गट तयार केला. त्यांनी आमदार धीरज लिंगाडे यांची भेट घेतली. या इच्छूक गटाने काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, एआयसीसीचे सचिव तथा प्रभारी कुणाल चौधरी आदी वरिष्ठ नेत्यांची भेट त्यांना उमेदवारीसंदर्भात पत्र सादर केले. या पत्रामध्ये अकोला पश्चिम मतदारसंघातून उमेदवारीसाठी आमच्या १५ पैकी एका उमेदवाराची निवड करावी, आम्ही त्या उमेदवाराला एकत्रितपणे निवडून आणू, असे नमूद केले. काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी मोठा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा : नागपुरातील समलैंगिकांचा ‘सारथी’ हरपला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उमेदवारी द्या,निवडून आणू

‘अकोला पश्चिम’मधून काँग्रेसची जागा निवडून येणे गरजेचे आहे. आमच्या १५ पैकी एकाला पक्षाने उमेदवारी दिल्यास आम्ही एकत्रितपणे निश्चित त्या उमेदवाराला निवडून आणू. यासंदर्भात आम्ही वरिष्ठांना पत्र सादर केले,’ असे प्रदीप वखारिया यांनी सांगितले.