गोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या गौरी-गणपती सणानिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. आता सरकारने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आनंदाने ‘शिधा’ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गरिबांच्या ‘दिवाळीचा गोडवा वाढला आहे. गोंदिया जिल्ह्यातील तब्बल २ लाख ४२ हजार ११ शिधाधारक कुटुंबांना त्याचा लाभ होणार आहे. या शिधाधारकांना नियमित चार वस्तूंसह अर्धा किलो पोहे आणि मैदाही वितरित करण्यात येणार आहे.

यापूर्वी गणेशोत्सवात वाटप करण्यात आलेल्या रेशनमध्ये एक किलो रवा, एक किलो डाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पाम (खाद्य) तेलाचा समावेश होता. नियमित रेशनसह या चार वस्तू १०० रुपयांमध्ये देण्यात आल्या. आता दिवाळीनिमित्त केवळ १०० रुपयांतच या चार वस्तूंसह पोहे आणि मैदा ही देण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> यवतमाळ शहर विकास आराखडा बैठकीत आमदारांवर प्रश्नांची सरबत्त

गतवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने प्रथमच आनंदाचा शिधा वाटप करून त्याची सुरुवात केली होती. गुढीपाडवा आणि गौरी – गणपती नंतर दिवाळीत पुन्हा आनंदाचे रेशन वाटप होणार आहे. यामुळे गरिबांना नक्कीच मदत होईल. मिळणाऱ्या शिधातून दिवाळीच्या काळात गरिबांना फराळ व मिठाई बनविण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य गटात एकूण २ लाख ४२ हजार ११ शिधापत्रिकाधारक आहेत. जिल्ह्यातील या कुटुंबांना आनंदाच्या रेशनचा लाभ होणार आहे.

१०० रुपयात काय मिळणार?

लाभार्थ्यांना प्रत्येकी अर्धा किलो मैदा, रवा, पोहे व चना डाळ, एक किलो साखर व एक लिटर खाद्यतेल वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ९९९ रेशन दुकानातून आनंदाच्या शिधाचे वाटप करण्यात येणार आहे.

आता रेशनमध्ये पोहे आणि मैदा ही

दिवाळीनिमित्त मैदा आणि पोह्यांचाही आनंदाच्या रेशनमध्ये समावेश करण्यात आला आहे. चार वस्तूंमध्ये आणखी दोन वस्तूंची भर पडल्याने रेशनमध्ये एकूण सहा वस्तू उपलब्ध होतील. दिवाळी गोड होईल दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. आनंदाच्या शिधावाटपात आणखी दोन गोष्टींची भर पडली आहे. चिवडा आणि शंकरपाळे हे विशेषतः दिवाळीच्या काळात बनवले जातात. या वस्तूंमध्ये मैदा आणि पोह्यांचा समावेश असल्याने शिधापत्रिकाधारकांना ते सोयीचे झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुरवठा अधिकारी म्हणतात …

गौरी-गणपती उत्सव काळात अंत्योदय व प्राधान्य गटातील २ लाख ३२ लाभार्थ्यांना आनंदाचा शिधाचा लाभ देण्यात आला होता. दरम्यान, दिवाळीच्या शिधा वाटपात सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यात अक्टीव झालेल्या रेशन कार्डनुसार २ लाख ४२ हजार पात्र लाभार्थ्यांना शंभर टक्के आनंदाचा शिधा वितरीत करण्यासाठी यादी पाठविण्यात आली आहे. शासनाकडून या आनंदाच्या शिधामध्ये पोहे व मैदा या पदार्थांची भर घातली असून केवळ शंभर रुपयात सर्व जिन्नस लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. तेव्हा पात्र लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. -सतीश अगडे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, गोंदिया