अकोला : तेल्हारा येथे एका नऊ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर २०१९ मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती.या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी न्यायालयाने आरोपीस २० वर्षांचा सश्रम कारावास आणि ६० हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे. अकोट येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी हा निकाल दिला. चंदू ऊर्फ चंद्रभान गोविंदराव कुकडे (५०) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे.

तेल्हारा येथे शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबातील एक नऊ वर्षीय मुलगी घरी जात असताना आरोपीने तिला सोडून देतो म्हणून दुचाकीवर बसवले. नराधम आरोपीने अल्पवयीन मुलीला दुचाकीने नदी जवळ नेऊन तिच्यावर अत्याचार केला. नदी पात्रातून पीडिता काठावर आल्यावर एका ऑटो चालकाने तिला रुग्णालयात दाखल केले. याची माहिती तिच्या वडिलांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडित अल्पवयीन मुलीने बालकल्याण समितीसमोर घडलेली संपूर्ण घटना कथन केली. या प्रकरणात पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणाची तपासणी केली असता त्यामध्ये आरोपी पीडितेला दुचाकीने घेऊन जातांना आढळून आला. या प्रकरणी ४ सप्टेंबर २०१९ रोजी तेल्हारा पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीने दुचाकी देखील त्याच्या एका नातेवाईकाची नेली होती. त्या दुचाकीची तोडफोड करून ती परत आणून दिल्याने नातेवाईकाने देखील आरोपी विरोधात पोलीस तक्रार केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. पीडित अल्पवयीन मुलीच्या वैद्यकीय तपासणीत तिच्या अंगावर जखमा आढळून आल्या. सुनावणीदरम्यान न्यायालयासमोर पीडित बालिका व तपास अधिकारी आदींसह एकूण १७ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. आरोपी चंदू ऊर्फ चंद्रभान गोविंदराव कुकडे (५०) याच्यावर दोष सिद्ध झाल्याने न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला असून, दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त सात महिने सश्रम कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. या प्रकरणात सरकारी वकील ॲड. अजित देशमुख यांनी प्रभावी युक्तिवाद केला. तपास पोलीस उपनिरीक्षक सुधाकर गवारगुरू यांनी केला होता. खटल्यात रामेश्वर राऊत यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.