नागपूर : दररोज शेकडो जण विविध प्रकारच्या सायबर फसवणुकीला बळी पडत आहेत. आयुष्यभर पोटाला चिमटा काढून पै पै जमावलेल्या रकमेवर एका क्षणात सायबर गुन्हेगार दरोडा टाकत आहेत. असेच फसवले गेलेल्या २०० पीडितांना त्यांनी गमावलेल्या मालमत्तेतली १० कोटी रुपयांची परतफेड आज होणार आहे. या खेरीज सायबर पोलिसांनी पोर्टलच्या माध्यमातून १२ कोटी ५ लाख रुपयांची रक्कम गोठवून ठेवली आहे. ती देखील टप्प्या टप्याने पीडितांना परत मिळेल.

पोलिसांनी विकसित केलेल्या गरुड drushti या अत्याधुनिक सोशल मीडिया मॉनिटरिंग साधनाचे सादरीकरण पाहण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोलीस मुख्यालयाला भेट देणार आहेत. त्यावेळी मुख्यमंत्री ही रक्कम पीडितांना सुपूर्द करणार आहेत. समाजमाध्यमांवरून पसरल्या जाणाऱ्या अफवा, द्वेषपूर्ण मजकूर, वादग्रस्त पोस्ट्समुळे होणारे तणाव व कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न टाळण्यासाठी पोलिसांनी सोशल मीडिया मॉनिटरिंग यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

सायबर हॅक २०२५ स्पर्धेतून स्थानिक नवकल्पनांना प्राधान्य देऊन कमी खर्चातील हे साधन विकसित करण्यात आले आहे. याचे बौद्धिक संपदा हक्क नागपूर पोलिसांकडे आहेत. गरुड दृष्टी मिशन अंतर्गत पोलिसांनी आतापर्यंत समाजमाध्यमांवरीर ३०,००० पोस्ट्स तपासल्या. त्यात ६५० पोस्टमध्ये आक्षेपार्ह सामग्री आढळल्याने त्या पोस्ट काढून टाकण्यात आल्या. गरुड दृष्टी केवळ गुन्हे प्रतिबंधासाठीच नव्हे, तर समाज माध्यमांवरील ट्रेंड्सचे विश्लेषण, संशयास्पद खाते शोधणे, व तत्काळ कारवाई करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.

निवृत्त पाटबंधारे कर्मचाऱ्याची ७२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे संचालक असल्याचा दावा करणाऱ्या इम्तियाजूर रहमानने पाटबंधारे विभागातील निवृत्त कर्मचारी प्रशांत रामचंद्र वानखेडे (६०) यांची ७२ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. सायबर गुन्हेगार इम्तियाजूर रहेमानने वानखेडे यांना ७०० पट लाभाच्या परताव्याचे आमिष दाखवत एक लिंक पाठवली. ती क्लिक केली असता त्यांना व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये घेतले गेले. ग्रुपमधील इतर सदस्यांना नफा मिळत असल्याचे पाहून वानखेडे यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ७२ लाख वळती केले. मात्र अंतिम मुदतीनंतर रहेमानने आणखी ५० लाखांची मागणी केली. त्याला नकार दिल्यावर रहेमानने कोणतेही पैसे परत केले नाही. सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला .

अशी होणार परतफेड

व्यक्ती रक्कम
रोहित अग्रवाल ७३,००,००० (सर्वाधिक रक्कम)
देविदास बोधराज पार्की ३५, १५, ८४२
शशिकांत परांडे ३४,७७,७२४
राजमणी जोशी २९,९५,०००
राहुल चावडा २६,२०,५६६
आदित्य गोयंका २६,२०,५६६
विजय पाठक १९, ९०, ३४२
विजय मेघनानी १९,००.०००
देवेंद्र खराटे १२, ८१,०००
बुद्धपाल बागडे १०, ००,०००

गरुड दृष्टी प्रकल्प हा नागपूर पोलिसांच्या नवकल्पक दृष्टिकोनाचा भाग आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हे प्रतिबंध आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या प्रकल्पामुळे गुन्हेगारांवर अंकुश ठेवताना सामाजिक ऐक्य व कायदा-सुव्यवस्थेची मजबुत होत आहे. लोहित मतानी, पोलीस उपायुक्त, सायबर शाखा.