अकोला : शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरातील विकास कार्यासाठी सुरू असलेल्या खोदकामात शनिवारी २०० वर्ष जुनी इमारत आढळली. भुयारी मार्गासारखी दिसणारी ही इमारत पाहण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली आहे. पुरातन श्री. राजराजेश्वर मंदिराचा विकास करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने आराखडा तयार केला. मंदिराच्या विकासासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात निधी देखील उपलब्ध करून दिला.
श्री राजराजेश्वर मंदिराच्या विकास कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. मंदिराच्या आजूबाजूचे विकास काम सुरू आहे. मंदिराच्या मागे लागूनच असलेल्या शिकस्त झालेल्या जुन्या इमारतीला पडण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत आहे. मंदिराच्या विकास कार्याला व्यापक स्वरूप देण्यासाठी खोदकाम केले जात आहे. हे खोदकाम चालू असताना जमिनीखाली भुयारी मार्गासारखी इमारत आढळून आली. ही इमारत २०० वर्षापेक्षा जास्त जुनी असल्याचे सांगितले जात आहे. पुरातन इमारत जमिनीमध्ये आढळल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात आले. जुने शहरातील खोदकाम सुरू असलेल्या जागेपासून काही अंतरावर पुरातन असदगड किल्ला आहे. ती इमारत ऐतिहासिक महत्त्व असलेल्या किल्ल्याचाच भाग आहे का, असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.
हेही वाचा…नागपुरात पुन्हा अमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये टोळीयुद्ध….एकाचे घरच पेटवले…..
इमारतींच्या भिंतीवर देवांचा जयघोष
इमारतीच्या पुरातन दगडांवर खूप वर्षांपूर्वी जय बजरंग बली, जय भोलेनाथ तसेच जय श्री राम लिहिलेलेसुद्धा आढळून आले. या भुयाराच्या आतमध्ये दोन छोट्या खोल्या बनल्या असून या भुयारात अंधार झाल्यानंतर कंदील लावण्याची सुविधादेखील करण्यात आल्याचे दिसून येते. इमारतीवर कोरीव काम केले आहे. ही भुयारासारखी दिसणारी इमारत नेमकी कशासाठी बांधली असावी, यासह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. खोदकामादरम्यान आढळलेली इमारत पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. या इमारतीविषयी प्रचंड कुतूहल दिसून आले.
हेही वाचा…संग्रामपूरला वादळाचा फटका; झाडे अन् विद्युत खांब जमीनदोस्त, वाहतूक ठप्प
अकोलेकरांचे श्रद्धास्थान
अकोला शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मध्य भारतातील सर्वात मोठा प्राचीन कावड व पालखी महोत्सव शेवटच्या श्रावण सोमवारी श्री राजराजेश्वर मंदिरातच साजरा केला जातो. श्री राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यासाठी कावड-पालखी सोहळ्याला ८० वर्षांची परंपरा आहे. १९४४ मध्ये अकोल्यात दुष्काळ पडला होता. त्यावेळी शिवभक्तांनी गांधीग्राम येथील पूर्णा नदीतील जल घेऊन राजराजेश्वराला अर्पण केले होते. त्यानंतर वरणराजा चांगलाच बरसला व दुष्काळ मिटला. तेव्हापासून ही प्राचीन परंपरा अविरत सुरू आहे.