नागपूर : रात्री सिंचन करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे शेतीसाठी दिवसा भरवशाचा वीज पुरवठ्यासाठी शासनाने जून – २०१७ मध्ये महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजना सुरू केली. त्यात ७.५६ मेगावाटचे दोन सौर ऊर्जा प्रकल्प ५ मे २०२३ रोजी महानिर्मितीने कार्यान्वित केले आहे. त्यामुळे लवकरच राज्यातील ८ गावातील २,२०० शेतकऱ्यांकडे लवकरच सौर कृषी वाहिनीतून वीज पुरवठा होणार आहे.

राज्यातील नागेवाडी येथील प्रकल्पाची स्थापित क्षमता ४.२ मेगावाट आहे. नागेवाडी तालुका तासगांव जिल्हा सांगली या सौर प्रकल्पामुळे नजीकच्या चार गावांना नागेवाडी, अंजनी, वडगांव आणि लोकरेवाडी या गावातील सुमारे १,२०० ते १,३०० वीज ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे. सदर प्रकल्प महावितरणच्या ३३/११ के.व्ही. अंजनी नागेवाडी उपकेंद्राला जोडण्यात आला आहे. सुमारे १० हेक्टर शासकीय पडीक जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात आला असून, प्रकल्प उभारणीचा खर्च १५ कोटी आहे.

हेही वाचा – नागपूर : नातवंडांचा हट्ट पुरवण्यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी चक्क सायकलच्या दुकानात

वालेखिंडी प्रकल्पाची स्थापित क्षमता ३.३६ मेगावाट आहे. वालेखिंडी तालुका जत जिल्हा सांगली या सौर प्रकल्पामुळे नजीकच्या चार गावांना वालेखिंडी, बेवनूर, सिंदेवाडी आणि नवलेवाडी या गावांतील सुमारे एक हजार कृषी वीज ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे. सुमारे ८ हेक्टर शासकीय पडीक जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात आला असून, प्रकल्प उभारणीचा खर्च १२ कोटी आहे. नजीकच्या महावितरणच्या ३३/११ के.व्ही. वालेखिंडी उपकेंद्राला सदर प्रकल्प जोडण्यात आला आहे.

या दोन सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे स्थानिक पातळीवर प्रत्येकी १० ते १५ व्यक्तींना रोजगार उपलब्ध झाला आहे. सौर ऊर्जेद्वारे मिळणारी वीज सुमारे रु.३.३० प्रती युनिट दराने मिळणार असून महावितरण समवेत वीज खरेदी करार करण्यात आला आहे. आगामी काही महिन्यांत महानिर्मितीचे बोर्गी (जिल्हा-सांगली) २ मेगावाट, कुंभोज (जिल्हा-कोल्हापूर) ४.४ मेगावाट, सोनगाव (जिल्हा-सातारा) ४.२ मेगावाट सौर ऊर्जा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत.

हेही वाचा – नागपूर : पोलीस ठाण्यातून चोरटे पळाल्याची अफवा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजघडीला महानिर्मितीच्या एकूण ३६७.४२ मेगावाट स्थापित क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पातून वीज उत्पादन होत आहे. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस आणि महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी. अनबलगन यांच्या सूचनेनुसार नुकतेच १०० मेगावाट सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी विकासकाला इरादा पत्र देण्यात आले आहे, तसेच आर्थिक वर्ष २०२३-२०२४ करिता सुमारे १ हजार मेगावाट सौर ऊर्जा प्रकल्पांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून संचालक (प्रकल्प) आणि संपूर्ण सौर प्रकल्प चमू यासाठी परिश्रम घेत असल्याचा महानिर्मितीचा दावा आहे.