नागपूर : गाव- खेड्यात आजही भोंदूबाबांची कमी नाही. छिंदवाड्यातील २७ वर्षीय तरुणाला विषारी साप चावल्यावर तो उपचारासाठी भोंदूबाबाकडे गेला. आठवड्याभरातच पायात गंभीर संसर्ग होऊन अळ्या पडल्या. तातडीने नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी ८ शस्त्रक्रिया करून तब्बल ४५ दिवस यशस्वी उपचार केल्याने रुग्णाला जीवदान मिळाले.
अंकुर भटघरे (२७) रा. छिंदवाडा, मध्य प्रदेश असे तरुणाचे नाव आहे. १७ जुलै रोजी अंकुरचा पायाला साप चावला. दुर्दैवाने त्याने सुरुवातीचे पाच दिवस गावठी उपचारांवर काढले. त्यामुळे उपचाराची मौल्यवान वेळ निघून गेली होती. जेव्हा त्याला नागपुरात आणले, तेव्हा त्याच्या डाव्या पायाला गंभीर इन्फेक्शन झाले होते. पायातून पस वाहत होता. जखमेवर चक्क अळ्या पडल्या होत्या. दुर्गंधीमुळे कुणीही जवळ उभे राहू शकत नव्हते. परिस्थिती इतकी गंभीर होती की दोन शासकीय आणि एका खासगी रुग्णालयाने त्याचा पाय कापण्याचा सल्ला दिला.
एका खासगी डॉक्टरांनी तर उपचार करायलाच नकार दिला. शेवटचा उपाय म्हणून अंकुरला नागपूरच्या सेंट्रल एव्हेन्यूवरील चांडक क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हॉस्पिटलचे संचालक डॉ. आर. जी. चांडक यांच्या चमुला ४५ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर डॉक्टरांना अंकुरचा पाय वाचवण्यात यश मिळाले. या यशस्वी उपचारात क्रिटिकल केअर विशेषज्ञ डॉ. आर. जी. चांडक, डॉ. किरण पटेल, डॉ. तरुण देशभ्रतार व डॉ. संजय मानकर, डॉ. विनोद बोरकर, डॉ. राजेश द्विवेदी, डॉ. किरण पटेल, डॉ. राजू हिवरले, डॉ. गणेश आणि गौरव वर्धेवार आणि इतर रुग्णालयातील वैद्यकीय चमुची भूमिका महत्वाची होती.
डॉ. आर. जी. चांडक यांचे म्हणणे काय ?
रुग्णाच्या पायावर सलग आठ मोठ्या शस्त्रक्रिया केल्या. उपचारासाठी आम्ही प्रगत ‘व्हॅक्युम असिस्टेड क्लोजर’ सिस्टीमचा वापर केला, ज्यामुळे जखमेतून तब्बल १६ लिटर पस काढण्यात आले. सतत औषधोपचार, ड्रेसिंग आणि शेवटी स्किन ग्राफ्टिंगच्या मदतीने पाय पूर्णपणे झाला. आज अंकुर स्वतःच्या पायावर उभा आहे आणि लवकरच त्याला डिस्चार्ज दिला जाणार आहे. सर्पदंशाच्या रुग्णांनी तज्ज्ञ डॉक्टरांकडून योग्य उपचार घ्यायला हवा. अंधश्रद्धेमुळे जीव धोक्यात येण्याचा धोका असतो, अशी माहिती डॉ. आर. जी. चांडक यांनी दिली. यापूर्वी, डॉ. चांडक यांनी एका विषबाधेच्या रुग्णाला वाचवण्यासाठी १९,३२० इंजेक्शन्स देऊन त्याचा जीव वाचवला होता, ज्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही झाली आहे.