नागपूर : नामिबिया येथून आणलेल्या पहिल्या तुकडीतील तीन चित्त्यांना मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या खुल्या जंगलात सोडण्यात येणार आहे. यात दोन मादी आणि एका नर चित्त्याचा समावेश आहे. त्यादृष्टीने मध्यप्रदेश वन्यजीव मुख्यालयाची तयारी सुरू झाली आहे.

१७ सप्टेंबर २०२२ला नामिबियातून आठ चित्ते भारतात आणले होते व मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात त्यांना खुल्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले. तत्पूर्वी त्यांना एक महिना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. नामिबियातील चित्ता तज्ज्ञांनी चित्ते निरोगी असून त्यांना जंगलात सोडले जाऊ शकते, असे आधीच सांगितले होते. मात्र, यादरम्यान मादी चित्ता ‘सासा’ जानेवारीत आजारी पडल्यानंतर मध्यप्रदेशच्या अधिकाऱ्यांनी चित्त्यांना जंगलात सोडण्याबाबत पाऊल मागे घेतले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील चित्ता तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला. त्यांनी देखील नामिबिया तज्ज्ञांप्रमाणेच चित्त्यांना जंगलात सोडण्यास हिरवा कंदील दाखवल्यानंतर तिन्ही चित्त्यांना खुल्या जंगलात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, चित्ता पाहण्यासाठी पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हेही वाचा >>> VIDEO : अन् म्हशी मागे धावताच वाघ जंगलात पळून गेला…

खुल्या जंगलातही चित्त्यांना पर्यटकांपासून दूर ठेवण्यात येणार आहे. बिबट्यांचा वावर असलेल्या भागात पर्यटकांना जाता येणार नाही. नामिबियातून सप्टेंबर २०२२च्या तिसऱ्या आठवड्यात नामिबिया येथून तीन नर आणि पाच मादी चित्ता आणण्यात आले. यातील तीन चित्ते जन्मापासूनच पिंजऱ्यात आहेत. त्यामुळे त्यांना खुल्या जंगलात सोडता येणार नाही. खुल्या जंगलाची सवय असलेल्या चित्त्यांनाच सोडता येते. चित्त्यांवर नजर ठेवण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. या चित्त्यांना कॉलर आयडी बसवण्यात आले असून अँटेना असलेले वाहनातून हे पथक प्रत्येक चित्त्यापासून १०० मीटरच्या त्रिज्येत राहील. चित्त्याच्य गळयातील रेडिओ कॉलरवरुन त्यांना सिग्लन मिळत राहतील.

हेही वाचा >>> निमढेलाचा वाघ जेव्हा म्हणतो, ‘जय हनुमान ज्ञान गुन सागर’…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्ता बराचवेळ बसला असेल किंवा त्याने हालचाली केली नाही तर ही चमू जवळ जाऊन पाहणी करेल. पन्ना व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसन कार्यक्रमात वाघांच्या देखरेखीसाठी हीच पद्धत अवलंबण्यात आली. कॉलरवरून जीपीएस ट्रॅकिंगची यंत्रणाही असेल. यासोबतच कुनो पार्कच्या हद्दीच्या एक किलोमीटर आधी मार्किंगही करण्यात आले आहे. चित्ता तेथे पोहोचताच फील्ड आणि वन्यजीव मुख्यालयातील अधिकाऱ्यांना आपोआप संदेश मिळेल. यानंतर उद्यानाच्या सीमेवर प्रत्येक पाच किमीवर तयार करण्यात आलेल्या चौक्यांचे कर्मचारी तेथे पोहोचतील आणि चित्त्यांना उद्यानात परत आणतील. दरम्यान, १८ फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेतून आणलेले १२ चित्ते अजूनही विलगीकरणात आहेत.