भंडारा : शाळांसाठी नवीन संरचनात्मक बदल करण्यात आले. संच मान्यतेत अन्यायकारक सुधारणा करण्यात आली. तथापि, माध्यमिक शाळांमध्ये दुर्गम व ग्रामीण भागातील गरीब पालकांची मुले शिक्षण घेतात. सदोष संच मान्यतेमुळे शिक्षकच मिळणार नाहीत. गरीब मुलांच्या शिक्षणाच्या मुळावर शासनाने घाव घातला आहे. तरी २०२४ – २५ संच मान्यता सुधारित करण्याची मागणी विविध संघटनांच्या माध्यमातून केली जात आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १५ मार्च २०२४ रोजी स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित आदी सर्व शाळांसाठी संच मान्यतेमध्ये सुधारित निकष जाहीर केले आहे. त्यानुसार सर्व शाळांना २०२४ – २५ या शैक्षणिक वर्षात संच मान्यता उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही संच मान्यता ३० सप्टेंबर २०२४ रोजीच्या आधार वैद्य असणाऱ्या विद्यार्थी संख्येनुसार देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
माध्यमिक शाळांमध्ये दुर्गम डोंगराळ, आदिवासी बहुल भाग, ग्रामीण भागातील गोरगरीब, शेतकरी, कामगार, व झोपडपट्टीत राहणाऱ्या पालकांची मुले मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहेत. २०२४ – २५ च्या सदोष संच मान्यतेमुळे शाळांना अध्ययन-अध्यापन करताना शिक्षकच मिळणार नाहीत अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे, भावी पिढी अशिक्षित, विद्यार्थ्यांची गळती, विद्यार्थ्यांची कुचंबना तसेच बाल कामगारांची निर्मिती होण्याची भीती व्यक्त होत आहे.
शाळांना मिळालेल्या अंशतः अनुदानित / अनुदानित शाळेतील शिक्षकांची पदे योग्य रीतीने दर्शविण्यात आलेली नाहीत. सुधारित संच मान्यतेत कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये विशेष शिक्षकांची गरज असताना चुकीच्या विशेष शिक्षकांची ( कला/ क्रीडा ) पदे दर्शविण्यात आलेली आहेत. तसेच स्टुडन्ट पोर्टलवर विद्यार्थी आधार कार्ड अवैध असल्यामुळे संच मान्यतेत विद्यार्थी संख्या कमी दर्शवण्यात आली आहे.
प्रत्यक्ष वर्गामध्ये विद्यार्थी उपस्थित असताना विद्यार्थ्यांचे आधार कार्ड विविध कारणाने जनरेट होऊ शकलेले नाहीत. अनेकदा अपडेट करून सुद्धा आधार कार्ड तांत्रिक अडचणीमुळे निघत नसल्याच्या फटका शाळांना सहन करावा लागला आहें. बिंदू नामावली संच मान्यता २०२४ – २५ नुसार शाळांना अद्यावत करण्यासाठी कालावधी मिळाला नाही. त्यामुळे शिक्षक समायोजनाची प्रक्रिया राबवणे अवघड होणार आहे.
जिल्ह्यातील ३९ शाळांना धोका…
भंडारा जिल्ह्यातील इयत्ता सहावी ते आठवीच्या २० पेक्षा पटसंख्या असणाऱ्या शाळांना सर्वाधिक धोका आहे. वीस पेक्षा कमी सहावी ते आठवी वर्गाची पटसंख्या असणाऱ्या शाळा १५ आहेत. तसेच माध्यमिक शाळा २४ असून त्या दोन्ही शाळांची संख्या ३९ होत आहे. अशा ३९ शाळा नवीन संच मान्यतेच्या निकषामुळे कायम बंद पडतील काय अशी भीती वाटायला लागली आहे.
संच मान्यतेत शून्य पदे…
शाळांना मिळालेल्या संच मान्यतेमध्ये नववी व दहावी पैकी एका वर्गाची पटसंख्या २० च्या आत असणाऱ्या शाळांच्या संच मान्यतेत इयत्ता नववी दहावी साठी शून्य पदे दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे त्या शाळांचे शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. प्रत्येक वर्गाला १० पटसंख्येला किमान दोन शिक्षक मंजूर करण्याची मागणी आहे.
सहा ते आठवीची एकत्रित विद्यार्थी संख्या विचारात घ्या
शाळांना मिळालेल्या नवीन संच मान्यतेमध्ये इयत्ता सहावी सातवी व आठवी या तीन वर्गातील वीस पट संख्येला किमान दोन शिक्षक मंजूर करण्यात यावे. तसेच त्या इयत्तांची संख्या एकत्रित करून वीस पेक्षा जास्त विद्यार्थी संख्येला तीन शिक्षकांची पदे मंजूर करावी अशी मागणी होत आहे.
२२ मे पर्यंत समायोजन करा…
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी २८ एप्रिल रोजी शिक्षण संचालक व सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना २०२४- २५ च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे समायोजन २२ मे पर्यंत करण्यात यावे असे पत्र धाडले आहे. तसेच दिलेल्या कालावधीतच अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ग्रामीण गरीब विद्यार्थ्यांच्या गावातल्या मराठी शाळेतील शिक्षणाची दारे बंद पडतील. गरीब विद्यार्थ्यांनी शिक्षणात घेऊ नये असे शासनाचे धोरण आहे. शासनाने २०२४ – २५ ची अन्यायकारक संचमान्यता सुधारित करावी. राजकुमार बालपांडे, अध्यक्ष, भंडारा जिल्हा मुख्याध्यापक असोसिएशन