अनिल कांबळे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : राज्यातील ५२० पोलीस हवालदारांची पदोन्नती गेल्या वर्षभरापासून रखडली होती. आता पोलीस महासंचालक कार्यालयाने पदोन्नतीची प्रक्रिया सुरू करीत पात्र हवालदारांकडून संवर्ग-बंधपत्र मागितले आहेत.

पोलीस महासंचालक कार्यालयातर्फे २०१३ मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी खात्याअंतर्गत परीक्षा घेण्यात आली होती. यानुसार, ५२० पोलीस हवालदारांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नतीसाठी यादी जाहीर करण्यात आली. मात्र, महासंचालक कार्यालयातील लालफीतशाहीमुळे पदोन्नती रखडली होती.  पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि आस्थापना विभागाचे अप्पर महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी पदोन्नती प्रक्रियेला सुरुवात केली. पदोन्नतीसाठी पात्र ३९७ पोलीस हवालदारांना नुकताच संवर्ग आणि बंधपत्र मागण्यात आला आहे.

नागपुरात १४ जणांना लाभ

पदोन्नतीसाठी नागपूर शहर आणि ग्रामीणमधून १४ पोलीस हवालदारांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली आहे. त्यात संजय तिवारी, राजेश वाकडे, सुरेंद्रकुमार पांडे, संजय आठवले, सुरेंद्र लामसोंगे, अनिल ब्राह्मणकर, सुरेश आठवले, संजयसिंह ठाकूर, राजेंद्र पाली, तिलोत्तम देवतळे, सुनील कामडी, अजय चौधरी, पुष्पपाल आकरे आणि नागोराव भुरे यांचा समावेश आहे. 

पोलीस उपनिरीक्षकांची २४५७ पदे रिक्त

राज्य पोलीस दलात सध्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या २४५७ जागा रिक्त आहेत. पोलीस दलात तपास अधिकाऱ्यांची वानवा आहे. त्यामुळे अनेक गुन्हे निकाली निघण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे २०१३ मधील उर्वरित पात्र कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती दिल्यास राज्य पोलीस दलात अनुभवी पोलीस अधिकाऱ्यांची संख्या वाढेल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 520 police head constables promotion process started by dgp office of maharashtra zws
Show comments