ज्येष्ठ नागरिकाची वयोमर्यादा ६५वरून ६० वर्षे करण्यात येत आहे. या संदर्भातील निर्णय येत्या महिन्याभरात घेण्यात येईल, अशी घोषणा सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केली.

आमदार मंगलप्रभात लोढा यांनी यासंदर्भातील लक्षवेधी उपस्थित केली होती. केंद्र सरकारच्या नियमानुसार ज्येष्ठ नागरिकांचे वय ६० वर्षे आहे आणि राज्यात त्यासाठी ६५ वर्षे वयाची मर्यादा घालण्यात आली आहे. राज्यातही ही वयोमर्यादा ६० वर आणावी, अशी मागणी अनेक सदस्यांनी लक्षवेधी बोलताना केली. यावरील उत्तरात बडोले म्हणाले, राज्यात ज्येष्ठ नागरिकांचे वय ६० करण्याचा निर्णय एका महिन्यात घेण्यात येईल. शिवाय ज्येष्ठ नागरिक धोरणाचीही अंमलबजावणी केली जाईल. तसेच निराधार लोकांच्या धर्तीवर ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्यात येतील, असेही ते म्हणाले.

एका घरात दोन ज्येष्ठ नागरिक असल्यास १२०० रुपये ऐवजी नऊशे रुपये दिले जाते. याकडेही सदस्यांनी लक्ष वेधले आणि ६०० रुपयांवरून किमान प्रत्येकी १००० मासिक मानधन देण्यात यावे, अशी मागणी केली. आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांवर कारवाई केली जाईल आणि मानधन वाढण्यासंदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल, असेही मंत्री म्हणाले.