अकोला : पूर्णा नदीच्या पात्रात वाहून गलेल्या ६५ वर्षीय आजीने झुडपाच्या सहाय्याने तब्बल २० तास पुराशी संघर्ष केला. दैव बलवत्तर म्हणून स्थानिक युवकांच्या मदतीने त्या आजीला वाचविण्यात यश आले.

अकोला जिल्ह्यातील आपोती येथील वत्सलाबाई शेषराव राणे (६५) या अमरावती जिल्ह्यातील भातकुली येथील बहिणीच्या मुलाकडे जात असताना वाटेतच असलेल्या ऋणमोचन येथे दर्शनासाठी थांबल्या. २१ जुलै रोजी ऋणमोचन येथे दर्शन झाले. त्या पूर्णा नदीच्या काठावर दर्शन व प्रसाद विसर्जनासाठी गेल्या असता अचानक पाय घसरल्याने थेट नदी पात्रात पडल्या. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तसेच पाण्याचा अंदाज न आल्याने आजी पूर्णा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्या. पूर्णा नदी दुथडी भरून वाहत होती. त्या दूरवर वाहून जात असताना मंदिरावर उपस्थित असणाऱ्या एका युवकाने पाहिले. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न युवकाने केला. पण तो त्यांना वाचवू शकला नाही. रात्री बऱ्याच वेळपर्यंत त्यांचा शोध सुरू होता. मात्र, त्या दिसून आल्या नाहीत. नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी आशा सोडून दिली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मूर्तिजापूर तालुक्यातील ऐंडली गावात २२ जुलैला दुपारच्या सुमारास शेतात असलेल्या दीपक कुरवाडे या युवकाला आजी पूर्णा नदीच्या पात्रात मधोमध एका छोट्या झुडपाला पकडून असल्याचे दिसून आले. दीपकने गावातील इतर युवकांना बोलावून आजीला नदी पात्रातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. आजीला या पाच ते सहा युवकांनी दोरीच्या साह्याने सुखरूप बाहेर काढले. बाहेर येताच आजीने आपबिती सांगितली. आजी तब्बल दीड कि.मी.अंतर नदी पात्रात वाहून गेल्यावर एका झुडपात अडकली होती. तब्बल २० तास पुराशी संघर्ष करून आजी सुखरूप बाहेर आली आहे. आता त्या आपल्या मुलीकडे आहेत.