कोणतेही वैद्यकीय शिक्षण नाही तरीही लाखो रुग्णांवर उपचार करून बरे केल्याचा दावा करणे आणि मी ‘कृष्ण’ तू ‘राधा’ असे सांगत महिला रुग्णांचे शोषण करण्याचा आरोप असणे ही साहित्य संमेलनाची यजमानपद मिळवलेल्या बुलढाण्यातील विवेकानंद आश्रमाची वैशिष्टय़े आहेत. बुवाबाजीचे पीक सध्या जोरावर आले असताना साहित्य महामंडळाने समस्त सारस्वतांना या अंधश्रद्धेची पाठराखण करणाऱ्या आश्रमाच्या दावणीला बांधण्याचा प्रकार हा निर्णय घेऊन केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे ९१वे साहित्य संमेलन बुलढाणा जिल्ह्य़ातील हिवरा या गावातील आश्रमात होणार आहे. केवळ चौथीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या शुकदास महाराजांनी १९६५ मध्ये हा आश्रम स्थापला. त्याला चतुराईने विवेकानंदांचे नाव देण्यात आले. शाळा, महाविद्यालये, रुग्णालय असा मोठा पसारा असलेला हा आश्रम तीन दशकांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. आपण विवेकानंदांचे भक्त आहोत असा दावा करणाऱ्या शुकदास महाराजांनी वैद्यकीय शिक्षणाचा कोणताही अनुभव नसताना या भागातील रुग्णांवर उपचार करणे सुरू केले. यासाठी त्यांनी आश्रमातच रुग्णालय उभारले. त्यांच्या भक्तांनी महाराजांच्या हाताला यश आहे असा प्रचार सुरू केला आणि पंचक्रोशीतील रुग्णांची गर्दी या आश्रमात व्हायला सुरुवात झाली. तब्येतीची तक्रार घेऊन आलेल्या कोणत्याही रुग्णाला शुकदास महाराज औषधाची एक पुडी द्यायचे. त्यात काय असायचे हे कुणालाच कळायचे नाही. मात्र हे औषध घेतले की रुग्ण बरा होतो असा दावा या आश्रमाकडून केला जायचा व त्याला दुजोरा देण्यासाठी काही रुग्णांनाही समोर केले जायचे. रुग्णांची तपासणी करण्याची महाराजांची पद्धतही वेगळी होती. पुरुषांना ते सर्वासमोर तपासायचे. महिलांना मात्र बंद खोलीत तपासायचे. महिलांना तपासताना हे महाराज ‘गेल्या जन्मी मी भगवान कृष्ण तर तू राधा’ असे सांगायचे, असा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी तेव्हा केला होता. मानव यांनी एका वृत्तपत्रात लेखमाला लिहून या महाराजांच्या ढोंगीपणावर प्रहार केला होता. तेव्हा हे प्रकरण खूप गाजले होते. आश्रम व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार मानव यांनी आरोप केले, पण त्याच्या समर्थनार्थ ते एकही पुरावा सादर करू शकले नाहीत. महाराज महिलांचे शोषण करतात, असा आरोप मानव यांनी केला. मात्र तसा कबुलीजबाब एकाही महिलेने दिला नाही. अखेर हे प्रकरण अकोल्याच्या न्यायालयात गेले. न्यायालयाने मानव यांनी या आश्रमाची बदनामी करू नये, असा आदेश दिला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 91th akhil bharatiya marathi sahitya sammelan shukdas maharaj ashram place issue
First published on: 13-09-2017 at 03:24 IST