तंत्रज्ञानाच्या युगात बहुतांश कामे ऑनलाइन झाली आहेत. बँकेत रक्कम जमा करणे आणि काढणेसुद्धा आता ऑनलाइन झाले आहे. मात्र या सुविधेचा कधी-कधी फटकासुद्धा बसतो. चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील एका मजुराला या ऑनलाइन व्यवहाराचा मोठ्ठाच फायदा झाला. त्याच्या बँक खात्यात ‘गुगल पे’ द्वारे तब्बल ९९ कोटी ९८ लाख १०६ रुपयांची रक्कम जमा झाल्याचा प्रकार गुरुवारी उजेडात आला. एवढ्या मोठ्या रकमेचा मोबाइलवरील संदेश पाहून त्याच्यासह गावक-यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. अखेरीस ते पैसे ज्या खात्यातून आले त्याच खात्यात बँकेच्या माध्यमातून परत पाठविण्यात आल्याची माहिती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागभीड तालुक्यातील मांगली येथील रहिवासी राजू देवरा मेलाम (४०) हा मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याची आर्थिक स्थिती बेताचीच. त्याचे बैंक ऑफ इंडियाच्या नागभीड येथील शाखेत खाते असून, गुरुवारी त्याच्या या बँक खात्यात ‘गुगल पे’ च्या माध्यमातून ९९ कोटी ९८ लाख १०६ रुपये जमा झाले.

हेही वाचा : चंद्रपूर : भाजप पदाधिकाऱ्याकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

तसा संदेश बँकेकडून त्याच्या भ्रमणध्वनीवर प्राप्त झाला. तो संदेश बघून क्षणभर त्याला विश्वासच बसला नाही, त्याने गावात काही नागरिकांनाही याबाबतची माहिती दिली. त्यामुळे गावातही याविषयी चर्चा सुरू झाली. दरम्यान, शुक्रवारी बँक ऑफ इंडियाच्या नागभीड शाखेतून राजू मेश्राम यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करण्यात आला. यावेळी बँक अधिकान्यांनी तुमच्या बँक खात्यात ९९ कोटी ९८ लाख १०६ रुपये जमा करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच इतक्या मोठ्या रक्कमेचे विवरण सादर करण्यास सांगण्यात आले.

हेही वाचा : अकोला : निसर्गरम्य वातावरणात ब्राह्मणी घारीचा मुक्तसंचार

बँक अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर राजू मेश्राम घाबरला. लगेच आपल्या एका सहकाऱ्यासह बँकेत जाऊन संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. तेव्हा बँक अधिकाऱ्यांनी खात्यात जमा झालेल्या रकमेबाबत विचारणा केली असता, मेश्रामने प्रामाणिकपणाने ही रक्कम आपली नसून चुकून आली असावी, असे बँक अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे बँक अधिकाऱ्यांनी नंतर ज्या खात्यातून ती रक्कम आली त्याच खात्यामध्ये ती वळती केली. अचानक एवढी मोठी रक्कम खात्यात जमा झाल्याचे पाहून राजू मेश्रामही गर्भगळीत झाला होता. मात्र ती रक्कम आपली नसल्याचे सांगून त्याने प्रामाणिकपणा दाखविल्याने त्याचे कौतुक होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 99 crore 98 lakh 106 rupees were deposited in the laborers account then it happened that in chandrpur tmb 01
First published on: 03-09-2022 at 10:32 IST