नागपूर : मी कॉम्रेड आहे आणि राज्यघटना म्हणजे केवळ ‘पीस ऑफ टॉयलेट पेपर’ आहे, अशी पोस्ट समाजमाध्यमांवर करणारा रेजाझ सिद्धीक हा जहाल नक्षलवादी असल्याचे व बंदी घातलेली कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) सह जेकेएलएफशी त्याचे संबंध असल्याचे उघड झाल्याने त्याच्यावर ‘यूएपीए’ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या तो नागपुरातील लकडगंज पोलिसांच्या कोठडीत असून गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.केरळमधील रेजाझ बी. शीबा सिद्दीक याने ‘ऑपरेशन सिंदूर’ विरोधात केलेल्या वादग्रस्त पोस्टनंतर नागपुरात अटक करण्यात आली होती. त्याच्यासोबत शहरातील एका नामांकित विधि महाविद्यालयात एलएलबीच्या पाचव्या सत्रात शिकणाऱ्या तरुणीलाही ताब्यात घेण्यात आले होते.

हॉटेलमधील त्याच्या रुममधून नक्षलवादी प्रा. साईबाबा याची पुस्तके, नक्षलवाद्यांना समर्थन करणारे काही पोस्टर्स आढळले होते. सिद्धीकच्या केरळमधील एर्नाकुलम येथील घरावर पोलिसांनी छापा टाकला असता दोन पेन ड्राईव्ह, दोन मोबाईल फोन आणि काही संशयास्पद कागदपत्रे मिळाली. प्राथमिक तपासात पाकिस्तानमधील आयएसआय एजंट्ससोबत यूके-आधारित सिम कार्डद्वारे झालेली संभाषणे उघडकीस आली आहेत. ही सर्व उपकरणे सखोल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

केरळमध्येही गुन्हे

सिद्दीक याच्यावर यापूर्वी केरळमध्ये काही गुन्हे दाखल असून तो केरळमधील ‘डेमोक्रॅटिक स्टुडंट युनिट’चा सदस्य आहे. तसेच भीमा कोरेगाव प्रकरणातील काही आरोपींशीही त्याचा संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. तो ‘कमिटी फॉर प्रोटेक्शन ऑफ डेमोक्रॅटिक राइट्स’ या संघटनांशी संबंधित होता. बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी)च्या आघाडी संघटनेशी त्याचे संबंध असल्याचे उघडकीस आले आहे. सिद्दीकने समाजमाध्यमावर काश्मीर बाबतही वादग्रस्त पोस्ट केल्या आहेत.

नक्षलवाद्यांसाठी निधी संकलन

सिद्धीकचा नक्षलवाद्यांशी संबंध असून त्यांच्यासाठी पैसे गोळा करण्यासाठी तो पुढाकार घेत होता. त्याच्या घरात सापडलेल्या पत्रकात काही ‘क्यूआर कोड’सुद्धा मिळून आले. त्या माध्यमातून बंदी असलेल्या संघटनांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन तो करीत होता. बंदी असलेल्या संघटनांच्या वरिष्ठ नेत्यांच्या तो संपर्कात होता, अशीही माहिती आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.