नागपूर : वाघांनाही आता स्वतःचा जीव वाचवताना नाकी नऊ येऊ लागले आहेत. कधी बहेलिया, तर कधी स्थानिक शिकाऱ्यांनी त्यांना जगणे अशक्य केले आहे. आधीच त्यांच्या अधिवासावर मानवी अतिक्रमण, माणसांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विकासकामांचे अतिक्रमण होत असल्याने वाघ गावाकडे धाव घेत आहे. मात्र, तिथेही त्यांचा जीव धोक्यातच आहे. मानवी वस्तीत शिरला म्हणून कधी जेरबंदीची टांगती तलवार, तर कधी स्थानिक शिकाऱ्यांचा ते बळी ठरत आहे. असाच एक प्रकार नागपूर जिल्ह्यात उघडकीस आला.

जिल्ह्यातील कुही वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या वन विकास महामंडळाच्या (एफडीसीएम) पोहरा बिट परिसरातील वेलतूर राउंडमध्ये वाघाची शिकार केल्याचा प्रकार समोर आला आहे. खड्डा खोदून वाघाला पुरण्यात आले. हा खड्डा खोदल्यानंतर वाघाची कातडी आणि काही हाडेही सापडली. ही घटना शुक्रवारी, नऊ मे रोजी उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी पोहरा बिटमधील कक्ष क्रमांक ४५६ मध्ये वन कर्मचारी कामावर गेले होते. संध्याकाळी परत येत असताना कर्मचाऱ्यांना हाडाचा एक मोठा तुकडा दिसला. हे पाहून वन कर्मचाऱ्यांना संशय आला. जेव्हा त्यांनी परिसराची पाहणी केली तेव्हा त्यांना एक जागा आढळली जी मातीच्या ढिगासारखी दिसत होती. त्यावर लाकूड ठेवून ते लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

त्या जागेचे खोदकाम केल्यानंतर, एका वन्य प्राण्याचे खराब झालेले शव, काही हाडे, चामडे इत्यादी आढळले. ही माहिती ताबडतोब वन अधिकाऱ्यांना देण्यात आली. शुक्रवारी अंधार पडू लागल्याने, दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी मृतदेहांची तपासणी केली असता, ते वाघाचे असल्याचे आढळून आले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे (एनटीसीए) एआयजी नंदकिशोर काळे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (पीसीसीएफ) चे प्रतिनिधी रोहित करू, उधम सिंग यादव यांच्या उपस्थितीत पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या पथकाने पुढील कारवाई केली.

ज्या पद्धतीने वाघाला खड्ड्यात पुरण्यात आले आहे त्यावरून त्याची शिकार करण्यात आली होती हे दिसून येते. वनविकास महामंडळाची (एफडीसीएम) चमू या प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान, हा स्थानिक शिकाऱ्यांनी केलेल्या शिकारीचा प्रकार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यादृष्टीने वनखात्याची चमू तपासणी करत आहे. मात्र, या शिकारीमुळे बहेलियांचा शिरकाव तर पुन्हा झालेला नाही ना, अशीही भीती व्यक्त केली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.