बुलढाणा: बिबट्याने हल्ला केल्याने शेतमजूर जखमी झाल्याची घटना बुलढाणा अजिंठा मार्गावरील देऊळघाट येथे घडली. युवकाने आरडाओरड केल्याने इतर शेतकरी धावून आल्याने त्याचा जीव वाचला. राजू बाबुराव सोनुने (३०, रा. बिरसिंगपूर, ता. बुलढाणा) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्यावर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
शेतमजूर राजू आज, शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास शेतात कामासाठी जात होता. दरम्यान, बुलढाणा ते देऊळघाट मार्गाजवळ असलेल्या दलाल यांच्या शेताजवळ एका बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. यात तो जखमी झाला. मात्र, प्रसंगावधान राखून त्याने आरडाओरडा केल्याने शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यांनी त्याच्याकडे धाव घेतली. त्यामुळे बिबट्या पळून गेला. जखमी राजू सोनुने यांना याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा… सुधारित वेतनश्रेणी देण्यास कंपनीकडून टाळाटाळ, कामगारांचे ‘बॉयलर’वर चढून आंदोलन
घटनेची माहिती मिळताच बुलढाणा वनविभागाचे कर्मचारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. बुलढाणा वन परिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे तत्काळ पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. जखमी युवक सुखरूप असून त्याला प्राथमिक मदत देणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.