चंद्रपूर : महापालिकेने सौंदर्यीकरणाच्या नावावर दोन कोटी खर्च करून शहरातील मुख्य चौकात १५ कारंजे सुरू केले. मात्र, आता ही कारंजी डास उत्पत्ती केंद्र व कचराकुंडी झालेले आहेत. योग्य देखभाल व दुरुस्ती होत नसल्यामुळे अनेक कारंजी बंद पडली आहेत.

महापालिकेकडून शहर स्वच्छता व सौंदर्यीकरण उपक्रमांतर्गत दोन वर्षांपूर्वी शहरात १२ छोटे व ३ मोठे कारंजे सुरू केले. एका कारंजावर दहा ते पंधरा लाख, याप्रमाणे दोन कोटींचा निधी खर्च करण्यात आला. तीन वर्षांपर्यंत या कारंजाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर आहे. मात्र, आता हे कारंजे पूर्णपणे बंद पडले असून त्याचे रुपांतर डास उत्पत्ती केंद्र तसेच कचराकुंडीत झाले आहे.

प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक, जटपुरा गेट, अंचलेश्वर गेट, हॉटेल सिद्धार्थसमोरील चौक, गिरनार चौक तसेच शहरातील अन्य मुख्य चौकात हे कारंजे आहेत. येथील काही जागरूक नागरिकांनी कारंजा दुरुस्ती करून पुन्हा सुरू करावे, अशी मागणी महापालिकेकडे केली. परंतु, त्यासाठी महापालिकेकडे वेळ नसल्याचे दिसते. या कारंजामध्ये मद्याच्या बाटल्या, चहाचे कप तसेच इतर कचरा साचलेला आहे. याच कारंजामध्ये डासांची उत्पत्तीही होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सौंदर्यीकरणाच्या नावावर कंत्राटदारांचे हित जोपासण्याचा प्रकार

केवळ कंत्राटदाराचे हित जोपासण्यासाठी महापालिकेने हे कारंजे तयार केले, असा आरोप माजी नगरसेवक संजय वैद्य यांनी केला आहे. या कारंजांमुळे शहराच्या सौंदर्यीकरणात कुठलीही भर पडलेली नाही, उलट डासांची समस्या वाढली. कंत्राटदाराकडून त्यांची देखभाल दुरुस्ती होत नाही. तेथे पाण्याची व प्रकाश व्यवस्था नाही. चौक सोडून जागा मिळेल तिथे हे कारंजे बांधले गेले. आता ते बेवारस आहेत. महापालिकेचा संबंधित विभाग सुस्त आहे. कारंजात टँकरने केव्हातरी पाणी टाकले जाते, मात्र स्वच्छता केली जात नाही, असे वैद्य यांनी म्हटले आहे. दरम्यान, कंत्राटदाराकडून या कारंजांची योग्य देखभाल दुरुस्ती केली जात नसेल तर कारवाई करू, असे महापालिकेचे अधिकारी सांगत आहेत.