यवतमाळ : महागाव तालुक्यातील काळी दौलत खान वनपरिक्षेत्रांतर्गत बारभाई तांडा शिवारात बिबट मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. दोन दिवसांपूर्वीच या बिबटाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमित झा यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
मृत बिबट्याचे वय अंदाजे चार ते पाच वर्षे आहे. वन विभागाची गस्त नसल्यामुळे मृत्यू पावलेला बिबट वन विभागाच्या निदर्शनास आला नाही. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती वन विभागाला दिली. काळी दौलत खान वनपरिक्षेत्रांतर्गत यापूर्वीही बिबटाच्या मृत्यूची घटना घडल्याने यात घातपाताची शक्यता व्यक्त होत होती. मात्र बिबट्याचे सर्व अवयव शाबूत असल्यामुळे घातपाताची शक्यता डॉ. अमित झा यांनी फेटाळून लावली. बिबट्याचे नमुने प्रयोगशाळेला पाठवण्यात आले असून अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
