नागपूर : राज्यात पावसाच्या सरींमध्ये गणरायाचे आगमण झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातून पावसाने उसंत घेतली असे वाटत असताना विदर्भात पावसाच्या सरींनी गणरायाचे स्वागत केले. त्यामुळे कोकणाकडे मोर्चा वळवलेला पाऊस पुन्हा विदर्भात सक्रीय झाल्याचे दिसून आले. सप्टेंबरच्या पहिल्या तीन दिवसात विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला. तर दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पावसाचे आगमण झाले आहे.

सप्टेंबर सुरुवातीच्या पावसाने नुकसान काय?

विदर्भ आणि मराठवाड्यात सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या तीन दिवसाच्या पावसाने दाणादाण उडवली. विदर्भात सर्वत्र पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. अनेक जिल्ह्यांमध्ये गावांचा संपर्क तुटला. तर पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने सहा जणांना जीव गमवावा लागला. तर विदर्भासह मराठवाड्यात शेतीचे मोठे नुकसान झाले. हजारो हेक्टरवरील पीक पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. विदर्भात प्रामुख्याने कापसाला मोठा फटका बसला. आता हवामानखात्याने विदर्भ आणि मराठवाड्याला पुन्हा एकदा हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाचा अंदाज दिला आहे.

हेही वाचा – नातवांनी मांडला गणपती, कौतुकाला आले गडकरी आजोबा…..एकाच घरात दोन….

पावसाचा अलर्ट कुठे?

हवामान खात्याने छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना आज पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला होता. तर धाराशिव, बीड या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाचा अंदाज दिला. दरम्यान, आता सात ते नऊ सप्टेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण घाटासह विदर्भात पावसाचा जोर पाहायला मिळाला. तर आणखी दोन दिवस हा पाऊस कायम राहणार असल्याचे देखील हवामान खात्याने म्हटले आहे.

हेही वाचा – नागपूर : ठाकरे सेनेचे विचार अमान्य, पण मशिदी वाचवण्यासाठी…..एआयएमआयएमच्या नेत्याकडून थेट प्रस्ताव…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कमी दाबाचा पट्टा कुठे?

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याला लागूनच ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर ओडिशा, दक्षिण पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्याकडे येताना ही प्रणाली आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे त्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होण्याची शक्यता आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने छत्तीसगड, उत्तर विदर्भ, दक्षिण मध्य प्रदेशाकडे सरकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळेच राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. याचा परिणाम म्हणजे सात ते नऊ सप्टेंबरदरम्यान कोकणसह पुणे, सातारा घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ, मराठवाड्यातही पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत.