नागपूर: लहान मुलांपासून वृद्धांपर्यंतच्या वयोगटात इंजेक्शनचे नावही घेतले तर मनात धडकी भरते. आता या सगळ्या वयोगटातील व्यक्तींना दिलासा देणारी बातमी नागपुरातून येत आहे. सुईचा वापर न करता दिले जाणारे इंजेक्शन नागपुरातही उपलब्ध झाले आहे. सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांनी हे इंजेक्शन मुलांना देण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

इंट्रामस्कुलर आणि सबक्युटिनस इंजेक्शनचा हा प्रकार आहे. सुई नसल्याने इंजेक्शन दिल्यावर सूज येत नाही. सुईचा वापर न करता औषध त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करते. या पद्धतीत एका पिस्टल सदृष्य लहान राॅडद्वारे स्क्रिंगच्या मदतीने उच्च दाबाचा वापर करून औषध शरीरात सोडले जाते. हे कमी वेदनादायक असून संसर्गाचा धोका कमी असतो. विशेषतः लहान मुलांसाठी आणि सुईची भीती असणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे. इन्सुलिन, लसीकरण यामध्ये या इंजेक्शनचा वापर वाढत आहे. या इंजेक्शनमुळे सुरक्षितता, वेळेची बचत आणि इंजेक्शनबाबतची भीती कमी होते. ही पद्धत आरोग्य सेवेत एक क्रांतिकारी बदल घडवू शकते असे बालरोग तज्ज्ञ आणि शासकीय मेडिकल महाविद्यालय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले. या इंजेक्शनचे प्रात्यक्षिक अमर इनक्लेव्ह, प्रशांत नगर, अजनी परिसरातील नंदिता हाॅस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटर येथे करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तज्ज्ञ काय म्हणतात?

सुई असलेल्या इंजेक्शनमुळे काही रुग्णांच्या नसांना इजा, संक्रमणासह इतरही धोके संभावतात. परंतु आधुनिक पद्धतीच्या सुई नसलेल्या इंजेक्शनमुळे हे धोके कमी होतात. त्यामुळे येत्या काळात हे इंजेक्शन लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी फायद्याचे असणार आहे, अशी माहिती डॉ. अविनाश गावंडे यांनी दिली.

इंजेक्शनबाबत महत्वाचे…

  • हे जेट इंड्युस तंत्रज्ञान आहे, दाबामुळे इंजेक्शन ४ सेमी आतपर्यंत जाते
  • हेल्थकेअर वर्कर, इंजेक्शन देणारे किंवा इंजेक्शन घेणाऱ्यांना यामुळे इन्फेक्शन होत नाही
  • सुईचा वापर होत नसल्याने इतर आजारांचही इन्फेक्शन होत नाही, मसल्समधील टिश्यू डॅमेज होत नाही
  • भारतात सहा महिन्यांपासून वयाच्या मुलांवर टेस्टिंग झाल्याने हे इंजेक्शन देता येते
  • ऑइल बेस्ड घट्ट इंजेक्शन देता येत नाही